‘फरार’ आरोपींसह न्यायालयाने जामिनावर किंवा निदरेष सोडलेल्या सराईत गुन्हेगारांचा ठावठिकाणा, त्यांच्या हालचालींचा माग आता पोलीस बसल्या जागी काढणार आहेत. हे कसब अंगीकारण्यासाठी सध्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. याचा फायदा प्रतिबंधात्मक कारवाईसह गुंतागुंतीच्या गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगारांवर प्रत्यक्ष पाळत ठेवून, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून, चौकशी करून त्यांची माहिती गोळा केली जाते. मात्र ही पद्धत पारंपरिक असून त्यात मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असतो. अनेक वेळी सराईत गुन्हेगारांकडून नेमकी माहिती मिळू शकत नाही. नातेवाईक, निकटवर्तीय, साथिदारांनाही त्यांचे मनसुबे, हालचालींबाबत माहिती नसते. या संधीचा फायदा घेत हेच आरोपी पुन्हा गुन्हे करतात. पोलीस सीसीटीव्ही चित्रण, मोबाइल लोकेशन, कॉल डेटा रेकॉर्डचे विश्लेषण करून पुरावे गोळा करतात याची जाणीव असल्याने सराईत गुन्हेगार गुन्हा करताना पुरावा मागे सुटू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतात. त्यामुळे गुन्हा करून दडून बसलेल्यांची शोधमोहीम पोलिसांसाठी द्राविडी प्राणायाम ठरतो. अशा परिस्थितीत समाजमाध्यमांआधारे, विविध अ‍ॅपआधारे बसल्या जागी संबंधित व्यक्तींचा ठावठिकाणा कसा शोधावा, त्याच्या हालचालींवर पाळत कशी ठेवावी याचे प्रशिक्षण सायबर तज्ज्ञ, सायबर विभागात कार्यरत अनुभवी अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिले जात आहे.

तूर्तास हे प्रशिक्षण वर्ग गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत, अन्वेषण कक्षातील अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण दिले जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

शोध सुरू असलेल्या आरोपीचे समाजमाध्यमांवर अस्तित्व आहे का, असल्यास ते कसे शोधावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच आरोपीचा ठावठिकाणा समाजमाध्यमांआधारे, विविध अ‍ॅपद्वारे कसा हुडकू न काढावा याचाही धडा प्रशिक्षणात सहभागी करण्यात आला आहे.

८० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड, गंभीर, गुंतागुंतीच्या गुन्ह्य़ांची उकल, गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवायांसाठी गुन्हे शाखेची निर्मिती करण्यात आली. २००५पर्यंत शहरात संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे अस्तित्व होते. मात्र त्यानंतर एखाद दुसरा गुन्हा वगळल्यास संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे अस्तित्व जाणवलेले नाही. त्याऐवजी वाढत्या सायबर गुन्ह्य़ांचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी गुन्हे शाखेचे अन्वेषण कौशल्यही अद्ययावत व्हावे या उद्देशाने प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे, असे गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या सुमारे ८० अधिकाऱ्यांनी आठ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.