मुंबई ही गुजराथी बांधवांचे माहेरघर आहे, मग मराठी माणसाचे काय सासर आहे, असा सवाल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा देश-विदेशातील नेटिझन्सनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर प्रतिक्रिया व्यक्त करीत राज ठाकरे यांनी आधी राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दाखवावी आणि नाशिकमध्ये काय काम केले ते सांगावे, असा प्रश्न वाचकांनी उपस्थित केला.
मस्कतहून सचिन म्हणतात, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे, मुंबई मराठी माणसासाठी सासरच आहे. काही तुमचा उपयोग नाही. मराठी माणसाचे नाव घेऊन आपण खूप मजा केली. आता तुम्ही तुमच्या वॉर्डात काय कामे केलीत, त्याची यादी प्रसिद्ध करा, असले फुकटचे इमोशनल अत्याचार काम नाही करणार .मोदी अगोदर खूप चांगले होते. उद्धवबरोबर गेले म्हणून वाईट, आम्हालाही कळते बरे थोडे थोडे. बर तुमची ब्ल्यू प्रिंट कुठे हरवली?
सी. व्ही. नावाणकर म्हणतात, तुमची ब्ल्यू प्रिंट दाखवा. नाशिकमध्ये काही करून दाखवा. मुंबईची फार फिकीर आहे तुम्हाला. मग मराठी माणसाला द्या तुमच्या टॉवरमध्ये फुकट जागा. ते जैन लोक करतात आपल्या माणसाना. नुसते भाषण नाही ठोकत. आता बस करा तुमचे नाटक. उद्धव आणि तुम्ही चांगले माहिती आहेत लोकाना.
पुन्हा एकदा बडबडले… नाशकात काही करणार का की अजूनही ब्ल्यू प्रिंटच बनवत आहे. बाकी तुमच्या तोडफोडीला कंटाळलो बुआ, असे म्हटले आहे विजय देशमुख यांनी.
कैरोमधून कदम म्हणतात, राज ठाकरे म्हणजे पलटी मास्तर म्हणावे लागेल !!! अगोदर मोदींबद्दल स्तुतीसुमने उधळत होता. आताविरुद्ध बोलत आहेत.
किती दिवस तोच चोथा चघळणार? जिथे सत्ता आहे (नाशिक) तिथे कामाच्या नावाने बोंब, वर कारणे तयार… पूर्ण बहुमत मिळाले असते तर… अरे मग सत्ता घ्यायला कोणी सांगितले होते? हे बोलले की समजा निवडणुका लागल्या… नाहीतर एरवी चिडीचूप, असे रोहन यांनी लिहिले आहे.
दरम्यान काही वाचकांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
मुंबईतून अभिजीत म्हणतात, गरज सरो आणि वैद्य मरो, हे भाजपसारख्या व्यापारीवृत्तीवाल्या लोकांची खासियत आहे. बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांच्या पाया पडायचे आणि गेले तर आता त्यांचे साधे स्मरणदेखील नाही. मोदी जर पंतप्रधान झाले, तर हे लोक उलटे चालतील. शेवटी भाजप काय किवा कॉंग्रेस काय दोघेही चोरच. एनडीएने काय कमी घोटाळे केले होते. त्यामुळे माझे मत मनसेला.
राज ठाकरे यांनी कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, अशी प्रतिक्रिया विष्णू यांनी दिली आहे.