गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दोन हजार गणपतींची ऑनलाइन नोंदणी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी भाविक मोठय़ा प्रमाणावर नोंदणी करीत असले तरी भाविकांना विसर्जनासाठी समुद्रात उतरण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. गणेशमूर्तीचे पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच चौपाटीवर विसर्जन करण्यात येणार आहे. चौपाटीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घराजवळच्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्याची विनंती चौपाटीसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना पालिकेकडून करण्यात येत आहे.

गणेशोत्सवात दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी दक्षिण मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर मोठय़ा संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात. यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर चौपाटीवर गर्दी होऊ नये यासाठी पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने एस. एम. जोशी क्रीडांगण, ऑगस्ट क्रांती मैदान, गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), बॉडीगार्ड लेन आरटीओ येथे कृत्रिम तलाव उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मोठय़ा ट्रकवरही विसर्जनाची फिरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेश विसर्जनसाठी भाविकांनी पालिकेच्या shreeganeshvisarjan.com  या संकेतस्थळावर नोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत दोन हजार भाविकांनी नोंदणी केली असून बहुसंख्य भाविकांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामुळे गिरगाव चौपाटीवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम तलावाच्या आसपासच्या भाविकांना तेथेच गणेश विसर्जन करण्याची विनंती पालिकेकडून करण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नोंदणी केलेल्या भाविकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात येत आहे.

कुलाब्यापासून लालबाग, परळ, चेंबूर परिसरांतील गणपतींचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते. गतवर्षी गिरगाव चौपाटीवर सार्वजनिक आणि घरगुती अशा एकूण तब्बल १३ हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा गिरगाव आणि आसपासचा परिसर वगळता अन्य ठिकाणच्या गणपतींचे तेथील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात येईल, असा पालिका अधिकाऱ्यांना अंदाज आहे. त्यामुळे संकेतस्थळावर सात ते आठ हजार गणपतींच्या विसर्जनासाठी नोंदणी होईल. त्यापैकी चार ते पाच हजार गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आणले जातील, असा पालिका अधिकाऱ्यांना अंदाज आहे.

रस्त्यावर होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या घरूनच विसर्जनासाठी गणेशमूर्ती स्वीकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. घरगुती गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी ‘डी’ विभाग कार्यालयाने चार वाहनांची व्यवस्था केली असून भाविकांच्या घराजवळ मूर्ती स्वीकारून तिचे पालिकेमार्फत विसर्जन करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना समुद्रात उतरता येणार नाही. पालिका कर्मचारीच गणेश विसर्जन करतील. चौपाटीवर येण्याऐवजी घराजवळच गणेशमूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यावी. त्यामुळे गर्दी टळेल आणि करोना संसर्गापासूनही सुरक्षित राहता येईल.

– प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग