मधु कांबळे

करोनाच्या संकटछायेत २९ जुलैला १०वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकाल ऑनलाइन असल्यामुळे सकाळपासूनच मुले, पालक मोबाइल, लॅपटॉप, संगणकाला आपलेसे करून बसले होते. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला आणि उत्तीर्ण झालेल्या मुलांनी कुटुंबीयांसमवेत घराघरात जल्लोष केला. ती १८ मुलेही उत्तीर्ण झाली, पण डिजिटल जगाच्या बाहेर अजून दिवाबत्ती नसलेल्या वाडय़ा-पाडय़ात राहणाऱ्या त्यांच्या गावी निकाल पोहोचलाच नाही.

तब्बल आठ दिवसांनी शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांनी पायपीट करून, एक एक गाव एक एक घर शोधून, मुले हुडकू न त्यांच्या हातात १०वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके ठेवतात आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला…

राज्य सरकारने २०१७ मध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ातील तोरणमाळ येथे एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे आंतरराष्ट्रीय शाळेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या शाळेत तोरणमाळच्या आजूबाजूच्या गाव-पाडय़ात राहणाऱ्या मुलांना प्रवेश देण्यात आला.

त्यात प्रामुख्याने शाळाबाह्य़ मुलांना सामावून घेण्यात आले. २०१७ मध्ये थेट ८वीत प्रवेश घेतलेल्या मुलांनी यंदा १०वीची परीक्षा दिली. त्यात १२ मुले व सहा मुली होत्या. विशेष म्हणजे ही सर्वच्या सर्व १८ मुले दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. शाळेचा शंभर टक्के  निकाल लागला. मात्र त्या १८ मुलांना त्याची गंधवार्ताही नव्हती, कारण निकाल ऑनलाइन लागला होता. त्यांना ते उत्तीर्ण झालेत की अनुत्तीर्ण हे कळणार तरी कसे, त्यांच्या गावात अजून दिवाबत्तीही नाही, सारा अंधारच. इंटरनेट वगैरे दूरच राहिले, मग त्यांना परीक्षेचा निकाल कळणार कसा, ही बोलकी प्रतिक्रिया आहे, या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर पाटील यांची. सध्या सुट्टी असल्याने व करोनामुळे शाळाही बंद असल्याने गावातच बंदिवान झालेल्या त्या मुलांनाच कळले नाही, की  ते उत्तीर्ण झाले आहेत म्हणून.

नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जालिंदर सावंत यांनी मग  इतर शिक्षक यांना बरोबर घेऊन पायपीट करून गावागावात, घराघरात जाऊन १०वी उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या हातात ऑनलाइन गुणपत्रके  ठेवली, त्यांचे कौतुक केले. आता त्यांच्या पुढील शिक्षणाचीही तयारी सुरू करण्यात आली आहे.

हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने मला आनंद झाला अशी प्रतिक्रिया नंदकुमार यांनी व्यक्त केली आहे.