पाल्यांच्या ऑनलाइन शाळांमध्ये आता पालकांनाही हजेरी लावावी लागणार आहे. पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांऐवजी त्यांच्या पालकांसाठी रोज अर्धा तास तर पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी १५ मिनिटे वर्ग घेण्यात येणार आहेत.

राज्यातील शाळा ऑनलाइन भरवण्यात येत आहेत. पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन वर्गाना हजर राहण्याच्या शाळांच्या सक्तीवर पालकांनी आक्षेप घेतल्यावर शासनाने पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंत ऑनलाइन वर्ग घेण्यास बंदी घातली होती. आता हे आदेश मागे घेत शासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही ऑनलाइन शाळांच्या नियमनासाठी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुलांबरोबरच पालकांनाही ऑनलाइन वर्गाना हजेरी लावावी लागणार आहे. पूर्वप्राथमिक वयोगटाच्या विद्यार्थ्यांऐवजी पालकांचेच वर्ग भरणार आहेत. पालकांनी रोज काय अभ्यास घ्यावा, कसा घ्यावा, उपक्रम काय घ्यावेत, हे शाळांनी रोज पालकांना सांगणे अपेक्षित आहे.

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ मिनिटे पालकांसाठी तर १५ मिनिटे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग भरेल. साचेबद्ध शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांनाही उपक्रम द्यायचे आहेत. त्यामुळे आता पालकांनाही आपल्या कामाच्या वेळा सांभाळत मुलांच्या ऑनलाइन वर्गात बसावे लागेल. तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मात्र आपापला अभ्यास करणे अपेक्षित आहे. दीड ते तीन तासांच्या कालावधीत या विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत.

वर्ग असे भरणार..

* पूर्वप्राथमिक ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आठवडय़ातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार भरतील

* पूर्वप्राथमिक – रोज ३० मिनिटे पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन

* पहिली आणि दुसरी – सोमवार ते शुक्रवार  ३० मिनिटांची दोन सत्रे – त्यातील १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण

* तिसरी ते आठवी – विद्यार्थ्यांसाठी रोज ४५ मिनिटांची दोन सत्रे

* नववी ते बारावी – विद्यार्थ्यांसाठी रोज ४५ मिनिटांची चार सत्रे