हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; विक्रेत्यांचे अब्जावधी थकवले 

तोटय़ात असलेल्या ई-व्यापार संकेतस्थळांचा डोलारा कोलमडू लागला असून ‘आस्क मी बाजार’ ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणून समोर आली आहे. कंपनीच्या देशभरातील कार्यालयांना कुलूप.. चार हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला.. विक्रेत्यांची अब्जावधी रुपयांची देणी थकलेली, अशी कंपनीची दुर्दशा झाली आहे.

ई-व्यापार संकेतस्थळांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे हेरून ‘आस्क मी बाजार’ने आपल्या व्यवसायाचे जाळे विस्तारले होते. बडय़ा कंपन्यांसोबतच लघु व मध्यम व्यापाऱ्यांनाही ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना ग्राहकांशी जोडण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून होत होते. त्यातून शेकडो विक्रेते कंपनीशी जोडले गेले. कंपनीने ‘आस्क मी ग्रोसरी’, ‘आस्कमी फर्निचर’ अशी उप संकेतस्थळेही सुरू केली होती. गेल्या जुलैपर्यंत कंपनीचा कारभार नीट चालू होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ‘एईएनएल’ या कंपनीने ‘आस्कमी’मधील गुंतवणूक काढून घेतली आणि कंपनी प्रचंड मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडली.

सुमारे तीन महिन्यांपासून ‘एईएनएल’कडून ‘आस्क मी’ला निधीच मिळाला नसल्याने कंपनीचा आर्थिक डोलारा कोसळळा आहे. देशभरातील सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार अद्यापि देण्यात आलेला नाही. तसेच, देशभरातील विक्रेत्यांचे देणेही थकित आहे. ही रक्कम अब्जावधी रुपयांच्या घरात जाते, असा आरोप विक्रेते व कर्मचारी करीत आहेत. कंपनीच्याविरोधात विक्रेते आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केले असून काही कर्मचारी मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.  कंपनीने कर्मचाऱ्यांना ९ ऑगस्ट रोजी काम थांबविण्याचा ई-मेल पाठविला.  यातच व्यवस्थापनातील उच्चपदस्थांनी गेल्या दोन महिन्यांत राजीनामा देत नोकरी सोडल्यामुळे मागच्या आठवडय़ात दोन नवीन संचालक नियुक्त झाले आहेत. या संचालकांनी गेल्या बुधवारी, कुणीही कार्यालयात न येता थेट घरून काम करावे, अशा आशयाचा ई-मेल कर्मचाऱ्यांना धाडला. आता, पुढे काय, कंपनी बंद करणार की चालू ठेवणार, बंद करणार असतील तर आमचे पैसे कोण देणार, असे एक ना अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहेत. मात्र ‘याबाबत व्यवस्थानाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही’, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

सरकारने हस्तक्षेप करावा

कंपनीच्या या कारभाराबाबत समाजमाध्यमांवर चर्चा रंगल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी, ‘कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी’, अशी मागणी केली आहे. ‘आस्कमी’मधील लघु भागधारकांनी ‘अ‍ॅस्ट्रो या कंपनीकडून अद्याप ३०० कोटींचे येणे असून ते पैसे दिल्याशिवाय कंपनीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये’ अशा आशयाचे पत्र कंपनी व्यवहार मंत्रालयाला आणि कंपनी नोंदणी निबंधकांना लिहले आहे. याबर सरकार काय भूमिका घेते याकडे विक्रेते आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अर्थकारण कसे चालते?

इतर ई-व्यापार संकेतस्थळांप्रमाणेच ‘आस्क मी’चे अर्थकारण आहे. इतर कंपन्यांना, विक्रेत्यांना आपले संकेतस्थळ विक्रीव्यवहारासाठी उपलब्ध करून द्यायचे व त्याचा मोबदला म्हणून ठराविक रक्कम घ्यायची.. उदा. १०० रुपयांच्या वस्तूची विक्री झाल्यानंतर त्यातील १० रुपये मोबदला म्हणून स्वतकडे ठेवायचे व ९० रुपये कंपन्या, विक्रेते यांना द्यायचे, अशी ही धाटणी. मात्र, ‘आस्कमी’ने मोबदल्याचे १० रुपये स्वतकडे ठेवलेच, शिवाय कंपन्या, विक्रेत्यांना द्यायचे ९० रुपयेही थकवून ठेवले. ही थकबाकीची रक्कम अब्जावधी रुपयांच्या घरात गेल्याच आरोप होत आहे.

‘आस्क मी’ विषयी..

‘गेटइट इन्फोसव्‍‌र्हिसेस’ ही कंपनी विविध उत्पादने विकणाऱ्या विक्रेत्यांची माहिती एकत्र करून येलो पेजेस प्रसिद्ध करीत असे. या कंपनीने सन २००६मध्ये डिजिटल माध्यमाचा स्वीकार करून ‘आस्क मी डॉट कॉम’ची निर्मिती करत येलो पेजेस ऑनलाइन उपलब्ध करून दिले. पुढे मलेशियातील ‘अ‍ॅस्ट्रो एंटरटेनमेंट नेटवर्क लि.’ (एईएनएल) या कंपनीने ९७ टक्के हिस्सा घेत ‘गेटइट’ विकत घेतली व ‘आस्क मी बाजार डॉट कॉम’ हे ई-व्यापार संकेतस्थळ सुरू केले. कंपन्या, व्यापारी, ग्राहक यांचा चांगला प्रतिसाद त्यास होता.