|| दिशा खातू

सवलतींचा पाऊस, दुकानांत एकावर एक मोफत

सण-उत्सवांच्या काळात बाजारांत, मॉलमध्ये उसळणारी गर्दी यंदा ऑनलाइन बाजाराने आकर्षित करून घेतली आहे. वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या अनेक संकेतस्थळांनी ग्राहकांवर आकर्षक सवलतींचा वर्षांव केला आहे. दुकानदार मात्र ‘एकावर एक मोफत’ अशा पारंपरिक योजनांवरच अवलंबून आहेत.

यंदा दसरा आणि दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर विविध कंपन्यांनी ऑनलाइन खरेदीवर मोठी सवलत दिली आहे. यात मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, पुस्तके यांवर मोठय़ा सवलती देण्यात आल्या आहेत. अनेक मोठय़ा कंपन्यांनी आपापल्या मोबाइलच्या नवीन आवृत्ती बाजारात आणल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोबाइलच्या खरेदीवर २० ते ७० टक्के एवढी मोठी सूट देण्यात आली आहे. ‘अ‍ॅमेझॉन’ या ई कॉमर्स कंपनीने तर सर्वात स्वस्त मोबाइल अशी जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.

गृहोपयोगी वस्तूंवर ऑनलाइन खरेदीत ४० ते ५० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. प्रवासाचे साहित्य, पादत्राणे यांवर ५० ते ६० टक्के, चॉकलेट, सुकामेवा, मिठाईवर ४० ते ४५ टक्के, डिजिटल कॅमेऱ्यांवर २५ ते ३० टक्के सवलती देण्यात आल्या आहेत. दूरचित्रवाणी संचांवर ३० ते ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. बाजार विश्लेषक संगम त्रिवेदी यांच्या मते दूरचित्रवाणी संचांचा बाजार सध्या मंदावला आहे. त्यामुळे संकेतस्थळे सवलती देऊन दूरचित्रवाणी संच विकण्याचा प्रयत्न करत आहेत.

धान्यावर अ‍ॅमेझॉनने २० ते ८० टक्के सवलत दिली आहे. साबण, बॉडी लोशन, शॅम्पूवर ३५ टक्के सूट आहे. अ‍ॅमेझॉनने किराणा माल विक्रीचा विभाग नव्याने सुरू केल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या सवलती देण्यात येत असल्याचे बाजार विश्लेषक आलोक जलोटा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनने पुस्तकांवर ७५ टक्के सूट दिली आहे.

दुकानात एकावर एक मोफत

  • दुकानांतील खरेदीवर फारशा सवलती दिलेल्या दिसत नाहीत. काही ठिकाणी १० ते २० टक्के एवढी सवलत देण्यात आलेली आहे; पण सवलत देण्याऐवजी ‘एकावर एक मोफत’ योजनेअंतर्गत वस्तू देण्यावर भर आहे.
  • जपानी, अमेरिकी, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी खरेदीवर हेडसेट, मेमरी कार्ड, टीव्ही फायर स्टिक या वस्तू मोफत दिल्या आहेत.
  • विशिष्ट कंपन्यांचे डेबिट कार्ड वापरल्यास १० टक्के सवलत देण्यात आली आहे. काही कंपन्यांनी खरेदीवर गिफ्ट व्हाऊचर्स दिले आहेत. कपडय़ांच्या काही ब्रॅण्डसने विशिष्ट रकमेची खरेदी केल्यास सवलत दिली आहे.
  • दुकानांमध्ये चायनीज कंपन्यांनी मात्र आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० ते ८० टक्के सवलत दिली आहे. अन्य दुकानांत फारशी सूट नसताना सुपर मार्केटमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.