सांस्कृतिक दिनाला बाजार समीकरणांचा स्पर्श
तरुणाई किंवा प्रौढांना आजवर आपल्या ऑफरच्या जाळय़ात ओढणाऱ्या ई-व्यापर संकेतस्थळांनी यंदा ‘बाल’ ग्राहकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खास ‘बालदिना’निमित्त विविध ऑफरचे आमिष दाखविले आहे. यात काही विमान कंपन्याही सहभागी झाल्या असून त्यांनी ‘बाल’प्रवाशांना खास सवलती देऊ केल्या आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या बालदिनी ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांपासून स्पर्धाचे आयोजन केले जात असे. मात्र या दिनानिमित्त ऑफर देऊन बालकांना खरेदीसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न यंदा प्रथमच एवय़ा मोठय़ा प्रमाणावर होत आहे. सरकारी विमान सेवा असलेल्या एअर इंडियाने तर बारा वर्षांखालील लहान मुलांना बाल दिनानिमित्त मोफत विमान प्रवासाची संधी देऊ केली आहे. याशिवाय भाग्यवान विजेत्यांसाठी मोफत देशांतर्गत आणि स्थानिक प्रवासाची खरात केली आहे. तर ई-व्यापार संकेतस्थळांवर तर वह्य़ा-पुस्तकांपासून ते लहान मुलांच्या कपडय़ांपर्यंत विविध वस्तूंवर भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्ट संकेतस्थळावर लहान मुलांसाठी पुस्तक महोत्सव भरला आहे. यात कमीत कमी ४५ टक्के इतकी भरघोस सवलत देण्यात आली आहे. ‘पे-टीएम’ या पेमेंट गेट-वेनेही विशेष सवलत दिली आहे. म्हणजे आपण लहानमुलांसाठी पुस्तके, वह्या, खेळणी, दप्तर, घडय़ाळ आदी वस्तू ऑनलाइन खरेदी केल्यानंतर या पेमेंट गेट-वेचा वापर केल्यास खरेदी किंमतीवर २० ते ३० टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. तर लहानमुलांसाठीच्या नेहरू जॅकेट्सवर स्नॅपडील संकेतस्थळावर ७५ टक्के सवलत आहे. याच जॅकेट्सवर अ‍ॅमेझॉनवर ५३ टक्के, जबाँग या संकेतस्थळावर ६० टक्के सवलत आहे. यंदा नेहरूंच्या टोपीचीही चलती असून ही टोपी २९ रुपयांपासून संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तसेच नेहरू कुडतेही ६९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. यंदा प्रथमच अशा ऑफर देण्यात आल्याने ‘बाल’ग्राहक या कंपन्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जॅकेट्सवर अ‍ॅमेझॉनवर ५३ टक्के, जबाँग या संकेतस्थळावर ६० टक्के सवलत