पहिले सत्र अंतिम टप्प्यात तरीही प्रशिक्षण नाही

अकरावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण ऑनलाइन करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला असून शिक्षकांनी मात्र ऑनलाइन प्रशिक्षणाला विरोध केला आहे. विविध विषयांच्या शिक्षक संघटनांनी प्रशिक्षण जुन्या पद्धतीनेच घेण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.

यंदा अकरावी आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला आहे. गेल्या वर्षीपासून शिक्षकांचे गट करून त्यांना मार्गदर्शकांकरवी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची पद्धत बदलून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. गेल्या वर्षी तासाभरात ऑनलाइन प्रशिक्षणे उरकण्यात आली होती. ऑनलाइन प्रशिक्षण हे एकतर्फी असते. त्यात अनेक शंका दूर होत नाहीत, मग प्रशिक्षण घेऊन उपयोग काय? असे आक्षेप शिक्षकांनी घेतले होते. तरीही विभागाने यंदाही प्रशिक्षण ऑनलाइन घेण्याचेच निश्चित केले आहे. मात्र त्यासाठी यंदाही अकरावीच्या शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे. भाषेची काठिण्य पातळी वाढली आहे. त्यासाठी शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण ऑनलाइन असू नये अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

औपचारिकताच ?

शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मिळणे अपेक्षित आहे. अकरावीची महाविद्यालये सुरू झाली असली तरी दुसरीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही प्रशिक्षण झालेले नाही. पहिल्या चाचणी परीक्षा घेण्याची वेळ आता आली आहे. मात्र, काय आणि कसे शिकवायचे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षीही शिक्षण विभागाने पहिले सत्र संपताना प्रशिक्षणे घेण्याची औपचारिकता उरकली होती.