शहरात इमारतींची संख्या वेगाने वाढत असली तरी अग्निसुरक्षेसाठी उपायांबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. अग्निप्रतिबंधाबाबत बेपर्वाइचा नमुना ताज्या दुर्घटनेमुळे स्पष्ट झाला आहे.  दक्षिण भागातील ४५ तर उपनगरातील ९३ इमारतींना अग्निशमन दलाकडून तपासणी अहवालाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. विशेष म्हणजे दर सहा महिन्यांनी ही तपासणी अद्ययावत करून घेणे अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार बंधनकारक आहे.
शहरात आगीची दुर्घटना घडली की इमारतींच्या अग्निप्रतिबंधक उपायांची चर्चा रंगते. मात्र वांरवार होत असलेल्या दुर्घटनांनंतरही सरकारी यंत्रणा व रहिवासी यांच्याकडून आगप्रतिबंधक उपायांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. काळबादेवी येथील गोकुळ हाऊस इमारतीच्या पाश्र्वभूमीवर ही उदासीनता अधिकच भयावह ठरते.
शहरातील एकूण इमारतींच्या संख्येबाबत महानगरपालिकेकडेही निश्चित आकडा उपलब्ध नाही. मात्र शहरात सुमारे अडीच हजार गगनचुंबी इमारती उभ्या असून दरवर्षी पालिका साधारण दीड हजार नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी देते. या सर्व इमारतींनी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत स्थानिक अग्निशमन दलाकडून उपाययोजनांची पाहणी करून घेणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर २०१४ पर्यंत शहरातील ३६३० इमारतींची पाहणी अग्निशमन दलाकडून करण्यात आली. तेव्हा त्यातील केवळ ४५ इमारतींनी अग्निप्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी केली होती. उपनगरातील २६६६ इमारतींच्या पाहणीपैकी ९३ इमारतींनाच अग्निशमन दलाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. शरद यादव यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली. शहरातील हजारो इमारतींपैकी केवळ १३८ इमारतींची संख्या पाहता आगीच्या दुर्घटनांमध्ये घट होण्याची शक्यता नजीकच्या काळात नाही.

* दरवर्षी शहरात सुमारे साडेचार हजारांहून अधिक आगीच्या दुर्घटना घडतात. यात दरवर्षी सुमारे अडीचशे नागरिक जीव गमावतात.  २००६ ते २०१३ या सात वर्षांच्या काळात ३२ हजारांहून अधिक ठिकाणी आग लागली.
* ही आग विझवताना तसेच नागरिकांची सुटका करताना या काळात २२१ अग्निशमन अधिकारी व जवान जखमी झाले तर दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
* कावळ्याला वाचवताना ३ डिसेंबर २०१२ रोजी उमेश पार्वते, तर लोटस पार्क येथील आग विझवताना १७ जून २०१४ रोजी नितीन इवलेकर शहीद झाले.