मुंबई :  केंद्र सरकारने देशभरातील ११५ शहरांमधून कोणते शहर राहण्यासाठी सुखकर आहे ते शोधण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेअंतर्गत सर्वात सुखदायक आणि आनंदी, स्मार्ट शहर निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र यंदा जनतेतून मतदान करून शहरांची निवड होणार असून या सर्वेक्षणात सव्वा कोटी मुंबईकरांपैकी केवळ १४ हजार जणांनीच मतदान केले आहे. त्यामुळे मुंबईचा क्रमांक घसरण्याची चिन्हे आहेत.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने ‘इज ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात ‘राहणीमान निर्देशांक सर्वेक्षण’ सुरू आहे. त्या अंतर्गत राहणीमानाकरिता सर्वोत्तम शहरांचे सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिका ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या सर्वेक्षणामध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे शहरातील नागरिकांकडून त्यांच्या शहराबद्दल मत नोंदविले जात आहे.

या सर्वेक्षणात मुंबईकरांना २४ वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. त्यात मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा कशी आहे,

मुंबईत प्रवास करणे सोपे आणि परवडणारे आहे का, घर घेणे किंवा भाडय़ाने राहणे परवडणारे आहे का, रात्री अपरात्री फिरणे सुरक्षित आहे का असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे.

शहरातील आरोग्य सेवा, स्वच्छता, कचरा संकलन, घरभाडे, मुलांसाठी शिक्षण, प्रवासाच्या सुविधा, अग्नशिमन व रुग्णवाहिका यासारख्या सेवा, महिला सुरक्षा, मनोरंजनाच्या सेवा, उदरनिर्वाहाच्या संधी, वित्तीय सेवा, हवेची स्थिती, हरित क्षेत्र, विद्युत पुरवठा आदींशी निगडित हे प्रश्न आहेत.

सहभागी होण्याचे आवाहन

गेल्या वर्षी या स्पर्धेत मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला होता, तर पुण्याला पहिला क्रमांक तर नवी मुंबईला दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदा मात्र नागरिकांची मते घेऊन त्यावर क्रमांक ठरवले जाणार आहेत. मात्र मुंबईकरांनी मतदानात फारसा उत्साह न दाखवल्यामुळे मंगळवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईक रांना या मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई शहराकरिता सर्व मुंबईकरांनी http://eolsqrz.org/Citizenfeedback पोर्टलवर ‘ग्रेटर मुंबई’ ला मतदान करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.