११३ प्रवासी जखमी; माहितीच्या अधिकारात मिळालेला तपशील

गेल्या साडेसहा वर्षांमध्ये रेल्वे गाडय़ांवर ११८ वेळा दगडफेकीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये सुमारे ११३ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांना फक्त २१ घटनांची चौकशी पूर्ण करण्यात यश आले असून या प्रकरणांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

उपनगरीय रेल्वे गाडय़ांवर आसपासच्या वस्त्यांमधून दगडफेक केली जाते आणि त्यात प्रवाशी जखमी होतात. मात्र या घटना रोखून आरोपींवर कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे दगडफेक करणारे आरोपी मोकाट असून त्यांच्याकडून दगडफेकीचे सत्र सुरूच आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे दगडफेकीच्या बहुतांश घटना मध्य रेल्वेमार्गावर घडल्या असल्याची माहिती आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यामध्ये कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दगडफेकीच्या सर्वाधिक ८४ घटना घडल्या असून त्यात ८१ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी १५ प्रकरणांचा छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. यामध्ये १३ आरोपींना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.  हार्बर रेल्वेमार्गावरील वडाळा ते पनवेल दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या २१ घटनांमध्ये १८  प्रवासी जखमी झाले.  यातील ५ प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावला असून त्यामध्ये ६ जणांना अटक करण्यात आली.  दगडफेकीच्या घटनांमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वात कमी घटना घडल्या असून पालघर ते चर्चगेट दरम्यान मागील साडेसहा वर्षांमध्ये १२ घटना घडल्या. त्यामध्ये १४ प्रवासी जखमी झाले. यापैकी एकाच प्रकरणाचा छडा लावण्यात रेल्वे पोलीस यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

ठाणे हद्दीत सर्वाधिक प्रकार

ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक ३५ दगडफेकीच्या घटनांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १८ घटनांची नोंद झाली. तसेच कल्याणमध्ये १७, वाशी येथे नऊ, वडाळा येथे नऊ, सीएसएमटी येथे सात, वसई रोड येथे पाच आणि दादर येथे चार घटना घडल्या आहेत. पालघर येथे दगडफेकीची एकही घटना घडल्याची नोंद नसल्याचे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.