अतिदक्षता विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा

मुंबई : ‘माझ्यासमोर करोना संसर्गाने प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यांना पाण्याबरोबरच औषधे देण्याचे, कृत्रिम श्वसन यंत्रणा लावण्याचे, रक्तदाब, हृदयाची हालचाल यावर देखरेख ठेवण्याचे काम मलाच करावे लागत आहे. असे ३५ रुग्ण सध्या माझ्यासमोर मृत्यूशी झुंजत आहेत आणि आम्ही केवळ तीन असाहाय्य निवासी डॉक्टर त्यांच्या सेवेला आहोत.. इथे ना परिचारिका आहेत ना वॉर्डबॉय नाही.. आम्ही तिघे गेले कित्येक तास इथूनतिथून धावतोय. केवळ रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी’..

ही परिस्थिती आहे केईएमच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील अतिदक्षता विभागातील. रुग्णांची काळजी घेण्यासाठी परिचारिकांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने येथील निवासी डॉक्टरांवर ताण येत असल्याची व्यथा केईएमच्या डॉक्टरांनी टिवट्रच्या माध्यमातून मांडली आहे.या अतिदक्षता विभागात ३५ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. परंतु यांना पाणी पाजण्यासाठी, जेवण भरविण्यासाठी, शौचास नेण्यासाठी परिचारिकांपासून वॉर्डबॉयपर्यंत कोणीच उपलब्ध नाहीत. आम्ही तिघांशिवाय येथे कोणीही आलेले नाही. रुग्णांच्या प्रकृतीची सातत्याने देखरेख करणे, त्यांना अत्यावश्यक औषधे देणे ही परिचारिकांची कामे आहेत. पण आम्ही यामध्येच गुंतले आहोत. अतिदक्षता विभागातील ३५ रुग्णांना तीन डॉक्टरांनी हाताळणे कठीण असून प्रचंड ताणाखाली आम्ही काम करत आहोत. याविषयी वारंवार वरिष्ठांना कळविले असूनही याची कोणीही दखल घेतलेली नाही. प्रत्येक वॉर्डमध्ये थोडय़ाफार फरकाने काही दिवसांपासून हीच अवस्था आहे. परंतु कोणीही मदतीसाठी आलेले नाही, असे वास्तव डॉक्टरांनी या चित्रफितीत मांडले आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या केवळ दीड टक्के आरोग्य यंत्रणेवर खर्च करणाऱ्या सरकारला या डॉक्टरांनी याचा जाब विचारला आहे. मोठय़ारुग्णालयात ही अवस्था आहे तर इतर रुग्णालयांची अवस्था काय असू शकेल याचा अंदाजही लावता येणार नाही, अशी प्रतिक्रिया या डॉक्टरांनी दिली आहे. यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकलेला नाही.