१२० तक्रारींपैकी ८२ खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा

मुंबई : दमदार पावसाला सुरुवात होताच मुंबईच्या रस्त्यांवर जाणवू लागणाऱ्या खड्डय़ांच्या त्रासाबद्दल मुंबई महापालिके कडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत आलेल्या १२० तक्रारींपैकी ८२ ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त ३० ठिकाणचे खड्डे बुजविणे शिल्लक आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेने २४ विभागांसाठी रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक जाहीर केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालिकेतर्फे दरवर्षी असे क्रमांक जाहीर केले जातात. मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांची तक्रार स्वीकारण्याकरिता पालिकेने  Mcgm 24*7  हे मोबाइल अ‍ॅपही आधीच सुरू केले आहे. रस्त्यावरील खड्डय़ाची छायाचित्रे काढून या अ‍ॅपवर अपलोड करता येतात. त्याचबरोबर १८००२२१२९३ या मोफत मदत क्रमांकावरही तोंडी तक्रार करता येणार आहे. यावर्षी टाळेबंदीमुळे रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी आहे. तरीही आतापर्यंत पालिकेकडे या मुंबईच्या विविध विभागांतून १२० तक्रारी आल्या आहेत. खड्डय़ांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही यावर्षी मोठय़ा प्रमाणावर कोल्डमिक्सचे उत्पादन केले आहे. १,१५० टन कोल्डमिक्स विभाग कार्यालयांमध्ये वितरित केले आहे, अशी माहिती रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जनतेच्या तक्रारी आल्यानंतर रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्याची कामेही सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

६७ तक्रारी २४ विभागांतून

खड्डय़ांच्या एकूण १२० तक्रारींपैकी ६७ तक्रारी या २४ विभागांतून आलेल्या आहेत. तर पाच तक्रारी पालिकेच्याच अन्य विभागांतून आलेल्या आहेत. २१ तक्रारी या म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए अशा अन्य प्राधिकरणाच्या रस्त्यावरील आहेत.

खड्डय़ांसाठी एकत्रित पथक नेमण्याची सूचना

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले. एमएमआरडीए, बीपीटी, मेट्रो, विमानतळ प्राधिकरण, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणाच्याही ताब्यातील रस्ता असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम केले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.