राज्यात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत स्थिती

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमासाठी विविध आरक्षणांची अंमलबजावणी केल्यास शासकीय महाविद्यालयांमध्ये राज्यातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पाच टक्केच जागा शिल्लक राहणार आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. पूर्वीपासून असलेली सामाजिक आरक्षणे, मराठा आरक्षण, आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण यांची अंमलबजावणी केल्यास राज्यातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवणे दुरापास्त ठरण्याची शक्यता आहे. सर्व आरक्षणे वगळून राज्यातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पाच टक्केच जागा शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय संचालनालयातील एका अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेजे वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेच्या सादरीकरणामध्येही याबाबत माहिती दिली होती.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा अखिल भारतीय प्रवेश कोटय़ातील असतात. म्हणजेच या जागांवर प्रवेश परीक्षेतून पात्र ठरलेले देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. राहिलेल्या ५० टक्के जागांना विविध आरक्षणे लागू होतात. पूर्वीपासून असलेले २५ टक्के सामाजिक आरक्षण, शारीरिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सेवेत असलेल्यांसाठी ७ टक्के जागा राखीव आहेत. त्यात आता मराठा आरक्षण आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांसाठीचे आरक्षण लागू होणार आहे. मराठा प्रवर्गासाठी आठ टक्के आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गासाठी पाच टक्के जागा राखीव असण्याची शक्यता आहे. असा हिशोब केला तर खुल्या प्रवर्गासाठी पाच टक्केच जागा शिल्लक राहू शकतील. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोटय़ात साधारण ६५० जागा आहेत. त्यातील ३२-३३ जागा खुल्या गटासाठी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोटय़ातून प्रवेश मिळवण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. अखिल भारतीय कोटय़ाची गुणवत्ता यादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. तसेच न्यायालयात सहा फेब्रुवारीला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यानंतर राज्याची नियमावली आणि प्रवेशप्रक्रियेचे तपशील जाहीर होतील.

आरक्षणाचे नियम लागू झाल्यास अशा प्रकारची उपलब्ध जागांची रचना असू शकते. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर प्रवेशप्रक्रियेच्या सूचना दिल्या जातील.

      – डॉ. प्रवीण शिणगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण