मुंबईत १ एप्रिल रोजी सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाल्यानंतर पुढील अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा एकदा अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. मुंबईत ४५ वर्षांवरील निम्म्याच नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यातही दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण जेमतेम सात टक्के आहे. त्यामुळे १ मेपासून सुरू होणाऱ्या पुढील टप्प्यातील लसीकरण मोहिमेच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस लशींचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतील अनेक केंद्र बंद करण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतर १ एप्रिलला दिवसभरात लस दिलेल्या नागरिकांची संख्या जवळपास ५५ हजार होती. त्यानंतर लसीकरण मोहीम वेग घेत असल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा लशींचा पुरवठा कमी होत असल्याने

मोहीम थंडावली आहे. मुंबईत

४५ वर्षावरील ४० लाख नागरिक आहेत.

त्यापैकी आतापर्यंत २० लाख ४३ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यातील २ लाख ७६ हजार म्हणजेच ६.९ टक्के नागरिकांनाच दुसरी मात्रा मिळाली आहे. मुंबईतील ४९ केंद्रे लस उपलब्ध न झाल्याने बुधवारी बंद ठेवावी लागली. अनेक नागरिकांना परत पाठवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. बहुतेक केंद्रांवर फक्त दुसरी मात्राच देण्यात आली.

ठाणे जिल्ह््यात बिकट परिस्थिती…

ठाणे : ठाण्यात महापालिकेच्या ५६ पैकी केवळ एकाच केंद्रावर बुधवारी लसीकरण सुरू होते. तर, खासगी रुग्णालयामध्येही अशीच अवस्था होती. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीणमध्ये दोन ते तीन दिवस, तर भिवंडीत मात्र आठ दिवस पुरेल इतका लशीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह््यामध्ये लशींचा तुटवडा पुन्हा जाणवू लागल्याचे चित्र आहे.

पनवेलमध्येही टंचाई

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात बुधवारी लसीकरणाची मोहीम २१ केंद्रांवर ठप्प पडली. लसीकरण पुन्हा कधी सुरू होणार याची माहिती पालिकेचे अधिकारी देत नव्हते. दिवसाला पनवेल पालिकेला २५०० लशींची गरज आहे.

नवी मुंबईत आज अनेक केंद्रे बंद

नवी मुंबई : मागणीनुसार लस प्राप्त न झाल्याने गुरुवारी शहरातील पालिकेची तीन रुग्णालये, तुर्भे माताबाल रुग्णालय व वाशी येथील कामगार विमा रुग्णालयातील जम्बो सेंटर येथेच लसीकरण सुरू राहणार आहे.