चीनमधून मागवण्याची तयारी; राज्यात आणखी दहा ठिकाणी करोना चाचणी

करोनाबाधितांवर थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक असलेल्या ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई) या संरक्षक पोशाखाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कमतरता असल्याने चीनमधून हे किट मागविण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे परवानगी मागितली आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट उपलब्ध आहेत.

मुंबई महापालिकेकडे आजघडीला डॉक्टरांसाठी ८,७०० पीपीई किट उपलब्ध आहेत. त्याच वेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १८ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केवळ ७०० पीपीई किट उपलब्ध असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीची संपूर्ण जबाबदारी पालिकेने जानेवारीपासून आजपर्यंत पार पाडली असून आतापर्यंत दोन लाख ७० हजार प्रवाशांची पालिकेच्या डॉक्टरांनी तपासणी केली. कस्तुरबा रुग्णालयात जानेवारीत केवळ २८ विलगीकरण खाटा होत्या. त्या वाढवून ४०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

करोनाचा धोका लक्षात घेऊन पालिकेने २१०० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे या खाटांची व्यवस्था केईएम, शीव व नायर रुग्णालयाशिवाय अन्यत्र पालिका रुग्णालयांत केली जाणार असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पालिकेकडे पुरेसे एन ९५ मास्क तसेच करोना चाचणीसाठी सहा प्रयोगशाळा असतील. यातील कस्तुरबा प्रयोगशाळेसह काही ठिकाणची चाचणी करण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे.

पालिकेने सुमारे २२२ रुग्णवाहिकांची तयारी ठेवली असून जिथे आवश्यक आहे तेथे पालिका वैद्यकीय कर्मचारी घरी जाऊन करोना संशयितांचे नमुने गोळा करतात. आतापर्यंत पालिकेने घरोघरी जाऊन ३९ हजार नमुने गोळा केले असून २४ तास चालणारी हेल्पलाइन सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने आता राज्यात दहा ठिकाणी करोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू केल्या असून १८ वैद्यकीय महाविद्यालयांत ‘फ्लू क्लिनिक’ सुरू केल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. याशिवाय जे जे ग्रुपच्या सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात तसेच पुणे येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्रपणे करोना रुग्णांवर उपचार केले जातील, असे देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आमच्याकडे डॉक्टरांना संरक्षण देता येतील यासाठी एचआयव्हीचे किट तसेच अन्य व्यवस्था आहे. आता नव्याने आवश्यकतेनुसार पीपीई किट घेण्याचे काम सुरू आहे.

करोनाचे रुग्ण आता गोंदियातही आढळून आले आहेत. आगामी काळात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १८ वैद्यकीय महाविद्यालयांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल हे लक्षात घेऊन आम्ही तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाशी तसेच सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून आम्ही काम करू

-अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री