धोकादायक पुलांची पाहणी करणार; महापालिकेचे आश्वासन

मुंबईमधील ठिकठिकाणचे धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे गणेशमूर्ती मंडपस्थळी कोणत्या मार्गाने घेऊन जायची असा प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पडला आहे. पालिका मुख्यालयात गुरुवारी झालेल्या गणेशोत्सव समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर पालिका, वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलीस लवकरच संयुक्तरीत्या धोकादायक पुलांची पाहणी करून तोडगा काढतील, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत पालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशोत्सव समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेश आगमन मार्गाबाबत चर्चा झाली. मुंबईमधील अनेक पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती यापूर्वी याच पुलांवरून घेऊन जात होते. मात्र आता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती कोणत्या मार्गाने घेऊन जायची, असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. याबाबत पालिकेला दोन महिन्यांपूर्वीच पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र हा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’ आहे, अशी तक्रार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केली. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गामध्ये मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याची बाबही अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली.

महापौरांचे आदेश

धोकादायक पुलांवरून गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी दोन दिवसांमध्ये पोलीस आणि वाहतूक पोलिसांबरोबर संयुक्त पाहणी करून पर्यायी मार्ग उपलब्ध करावे, असे आदेश विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त होतील, असेही ते म्हणाले.