08 March 2021

News Flash

सशर्त परवानगीनंतरही चित्रनगरी सुनीच

केवळ आठ मालिकांचे चित्रीकरण सुरू; निर्मात्यांकडून सेटची डागडुजी, स्वच्छता कामांना सुरुवात

केवळ आठ मालिकांचे चित्रीकरण सुरू; निर्मात्यांकडून सेटची डागडुजी, स्वच्छता कामांना सुरुवात

मुंबई : कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेत राज्य सरकारने चित्रीकरणाला सशर्त परवागनी देऊन महिना उलटत आला तरी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा रंग अजूनही उडालेलाच आहे. एरव्ही ३५ ते ४० मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण होणाऱ्या या ठिकाणी आज अवघ्या आठ मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.

करोनाकाळात मालिका-चित्रपटांचे काम बंद पडल्याने कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते ते वाहिन्यांपर्यंतची संपूर्ण साखळी आर्थिक नुकसान सहन करत होती. यावर तोडगा म्हणून सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून चित्रीकरणाला परवानगी दिली. परंतु परवानगी देऊन बराच काळ लोटला तरी चित्रीकरणाला वेग आलेला नाही. एखाद्या कलाकाराला करोनाची लागण झाली तर पुढे काय, अतिरिक्त सुरक्षेमुळे वाढलेला आर्थिक भार, निर्माते आणि वाहिन्या यांच्यातील समन्वय आणि कलाकारांचा नकार अशा अनेक कारणांमुळे चित्रीकरण ठप्प आहे.

‘पूर्वी आमच्या मालिकेचा १४५ जणांचा संच होता. आता अवघ्या ४५ जणांमध्ये चित्रीकरण करावे लागत आहे. मनुष्यबळ कमी झाल्याने चित्रीकरणाचा वेग मंदावला. त्यामुळे निर्मिती करणे आव्हानात्मक झाले आहे,’ असे ‘एक महानायक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचे निर्मिती व्यवस्थापक दीपक खन्ना यांनी सांगितले. नुकतेच या मालिकेच्या सेटवर बाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण चित्रनगरीतील वातावरण गंभीर झाले आहे. यावर तोडगा म्हणून बऱ्याच मालिकांनी तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कलाकारांची राहण्याची सोय चित्रनगरीतच केली आहे. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्या सेटवरही अशाच उपाययोजना के ल्या जात आहेत. ‘गेले तीन महिने चित्रीकरण बंद असल्याने इथले वातावरण निर्मनुष्य झाले होते. निवडक कर्मचारी आणि १०६ सुरक्षारक्षक केवळ यांचाच वावर होता. पूर्वी दिवसाला ३५ ते ४० ठिकाणी चित्रीकरण व्हायचे. मालिका, चित्रपट, जाहिराती असे मिळून किमान पाच एक हजार लोक रोज चित्रनगरीत येत असे. आता ही संख्या केवळ २००-२५० वर आली आहे,’ अशी माहिती तिथल्या सुरक्षारक्षकांनी दिली. सध्या चित्रनगरीत ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या एकमेव मराठी मालिकेचे, तर ‘एक महानायक’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘छोटी सरदारनी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘बॅरीस्टर बाबू’, ‘टी. व्ही. सीरियल’, ‘लुडो’ अशा सात हिंदी मालिकांचे चित्रीकरण सुरू  आहे. ‘या आठवडय़ात काही निर्मात्यांनी संपर्क साधला असून सेटची डागडुजी, स्वच्छता सुरू झाली आहे. काही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याने तेही सेट रिकामे आहेत. कलाकारांच्याही मनात भीती असल्याने सर्व जुळवाजुळव करून चित्रीकरण सुरू करायला वेळ लागत आहे. १५ दिवसांत अजून सकारात्मक प्रतिसाद मिळेल,’ अशी अपेक्षा व्यवस्थापक संगीता शेळके यांनी व्यक्त केली.

चित्रीकरणासाठी सशर्त परवानगी देण्यात आल्यानंतर चित्रनगरी सर्वासाठीच खुली केली आहे. परंतु करोना काळात चित्रीकरण करणे हे तितकेच जबाबदारीचे आणि जोखमीचे आहे. कोणतेही काम थांबवून चालत नाही. त्यावर उपाययोजना करून ते सुरू ठेवावे लागते. त्यामुळे लवकरच चित्रनगरी पूर्ववत होईल.

– सुभाष बोरकर, सहव्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:38 am

Web Title: only eight tv serial shooting started in filmcity zws 70
Next Stories
1 ..आता ‘एमयुटीपी-३’ प्रकल्पांना गती
2 अधिकारी नेमल्याने मुंबईतील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध
3 केईएम रुग्णालयात तरुणाची आत्महत्या
Just Now!
X