आरोग्य विभागातील करोना निर्मूलन सेवेतील कर्मचाऱ्यांचेच अर्ज मंजूर

मुंबई : करोना निर्मूलनात के वळ वैद्यकीय सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई कें द्र सरकारचे धोरण असताना सरसकट सर्वच मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे  भरपाईचे अर्ज केंद्राकडे पाठविण्याच्या मुंबई महापालिके च्या कार्यपद्धतीमुळे आतापर्यंत १३४ मृतांपैकी के वळ १५ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाच नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

गेल्या पाच महिन्यांत पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी बाधित झाले आहेत. तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्या बरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागांतील कर्मचारी, शिपाई हे कर व संकलन विभाग, सफाई विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत १३४ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत, कोविड १९ शी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत नुकसानभरपाईसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी अर्ज केले असता केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचेच अर्ज विमा कंपनीने मंजूर केले आहेत. मात्र करोना निर्मूलनासाठी सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्ये या पद्धतीचे काम करणाऱ्या विविध प्रवर्गांतील कामगार/कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांचा कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्यासाठी पालिकेने वेगळी सानुग्रह अनुदान योजना सुरू केली असून त्यातही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ १५ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाच याचा लाभ मिळाला  आहे.

पालिकेच्या एकूण १३४ कर्मचाऱ्यांचा बळी गेला असून त्यापैकी २८ कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत. बाकीचे कर्मचारी हे पालिकेच्या अन्य विभागांतील आहेत. त्यापैकी केंद्र सरकारने केवळ आरोग्य विभागातील आणि प्रत्यक्ष करोना वॉर्डात काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य विभागातील जे कर्मचारी थेट करोना वॉर्डात काम करीत आहेत अशाच कर्मचाऱ्यांना केंद्राने नुकसानभरपाई दिली असून अन्य विभागात काम करणाऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मात्र अन्य विभागातील कर्मचारीही करोनाशी संबंधित काम करीत असल्यामुळे त्यांचेही अर्ज मंजूर व्हावे याकरिता पालिका प्रशासन केंद्र सरकारच्या उत्तराची वाट पाहत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर अर्जांची छाननी

आरोग्य विभाग वगळून पालिकेचे जे कर्मचारी मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून कागदपत्रे मागवून त्याची छाननी करण्याचे काम सुरू असून त्यानंतर हे अर्ज लेखा विभागाकडे पाठवले जाणार असल्याचेही सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असावा अशी अट घालण्यात आली आहे.