‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात उच्च न्यायालयाने सलमान खानची निदरेष मुक्तता केल्यानंतर त्याच्या एका चाहत्याने आपल्या वांद्रे येथील ‘भाईजान’ या उपाहारगृहात सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ देऊ केले. दुपारी उच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आपल्या ‘भाईजान’ या उपाहारगृहात भाईच्या चाहत्यांसाठी सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याचे मालक गोविंद नारायण यांनी जाहीर केले आणि या उपाहारगृहात एकच गर्दी उसळली. ‘भाईजान’ हे या उपाहारगृहाचे नावदेखील सलमान खानच्या प्रेमाखातर दिले असल्याचे गोविंद नारायण यांनी सांगितले. सलमान खानची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल अत्यानंद झाला असून आमच्यासाठी न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी या प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठय़ा संख्येने लोक ‘भाईजान’मध्ये दाखल झाले. ‘हवी तेवढी सवलत मिळेल’ असे कळताच खवय्यांनी १० टक्क्यांपासून ९० टक्क्यांची सवलत घेऊन सलमानच्या सुटकेचा आनंद साजरा केला. संध्याकाळी सहापर्यंत दोनशेहून जास्त लोक उपाहारगृहात दाखल झाले होते, असे नारायण यांनी सांगितले.