पालिका शाळांमधील इयत्ता आठवी व दहावीमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ४३,८४१ पैकी केवळ ४,५५४ टॅब बंद असून उर्वरित टॅबचा वापर विद्यार्थी करीत असल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. इयत्ता आठवीच्या टॅबमध्ये बालभारतीच्या संकेतस्थळावरील पुस्तके डाऊनलोड करण्यात आली असून टॅबवरील पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यास करीत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाच्या आधारे ‘४० हजार टॅब नादुरुस्त’ या मथळ्याखाली २८ डिसेंबरच्या ‘लोकसत्ता, मुंबई’ सहदैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात प्रशासनाकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी करण्यासाठी त्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करताना पालिकेने २०१५-१६, २०१६-१७ या दोन वर्षांत ४३ हजार ८४१, तर २०१८-१९ मध्ये १८,०७८ टॅब खरेदी केले. आजघडीला पालिका शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एकूण ६१,९१९ टॅब देण्यात आले आहेत. यापैकी १८,०७८ टॅब कार्डसह इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले असून ते सुरू आहेत. इयत्ता आठवी व दहावीमधील विद्यार्थ्यांना उर्वरित ४३,८४१ टॅब देण्यात आले असून त्यातील ४,५५४ टॅब बंद असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबमध्ये एसडी कार्ड असून ते विद्यार्थी वापरत आहेत, असे पालिकेने नमूद केले आहे.

निविदा प्रक्रिया.. : शिक्षण विभागाने २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये खरेदी केलेल्या ४३,८४१ टॅबची दुरुस्ती आणि कंटेट संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन तातडीने कंटेंट खरेदी करण्यात आले असून विद्यार्थी कार्डसह टॅबचा वापर करीत आहेत. इयत्ता आठवीच्या टॅबमधील कार्ड प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोळा केली आहेत. मात्र असे असले तरी टॅबमध्ये ८ जीबी इतकी अंतर्गत मेमरी असून बालभारतीच्या संकेतस्थळावरील पुस्तके टॅबमध्ये डाऊनलोड करण्यात आली आहेत. विद्यार्थी अभ्यासासाठी या टॅबचा वापर करीत आहेत, असेही पालिकेने म्हटले आहे.