संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींचा शोध घेण्याचा आदेश शासनातर्फे जारी करण्यात आला. वास्तवात मात्र, या आदेशाचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील ३१ जिल्ह्य़ांत करोनाबाधिताच्या संपर्कातील सरासरी ४.२ व्यक्तींनाच शोधण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आरोग्य विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार, राज्यातील ३१ जिल्ह्य़ांत करोनाबाधिताच्या संपर्कातील सरासरी दहा व्यक्तींना शोधण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा पाहणी केली तेव्हा गंभीर रुग्णांच्या (हाय रिस्क) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ लोकांचाच शोध घेतल्याचे, तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के इतके झाल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

एकीकडे मुंबईसह राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णसंख्याही कमी होत आहे. मात्र, बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याबाबत गांभीर्यता नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेमुळे अनेक रुग्ण शोधता आले. तसेच कोमॉर्बिड व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सावध करता आल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

सातारा, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्य़ांत एका करोना रुग्णामागे ४ ते ७.८ संपर्कातील व्यक्तींना शोधण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. गंभीर बाब म्हणजे ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर या करोना रुग्णांची मोठी संख्या असलेल्या भागांत योग्य काळजी न घेतल्यास करोना पुन्हा वाढू शकतो, अशी भीती डॉक्टरांना वाटते.

महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचे ४३ हजार १५ बळी गेले आहेत तर मुंबईत दहा हजार ८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोना मृत्यूपैकी एकटय़ा मुंबईत ८.५ टक्के मृत्यू झाले असून मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर तसेच करोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन न झाल्यास मुंबईचे चित्र पुन्हा बदलू शकते, असे कृती दलातील (टास्क फोर्स) डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर काळजी मुंबईकरांनी घ्यावी, असे आवाहन राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले आहे.

दुर्लक्ष..

ठाण्यात एका करोनाबाधितामागे संपर्कातील ३.९, तर कोल्हापुरात केवळ ३.५ संपर्कातील व्यक्ती शोधण्यात आल्या. पुण्यात अतिजोखमीच्या गटातील ३.१, तर नागपूर अतिजोखमीच्या गटातील २.८ रुग्ण शोधण्यात आले असल्याचे समोर आले आहेत. करोना रोखण्याच्या प्रभावी मार्गाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यास साथ आटोक्यात कशी येईल, असा सवाल आरोग्य विभागातील डॉक्टरांनी केला आहे.