आर्थिकदृष्टय़ा मागास रुग्णांसाठी २० खाटा राखून ठेवण्याची अट असतानाही विद्याविहार येथील के. जे. सोमय्या धर्मादाय रुग्णालयाने टाळेबंदीच्या काळात केवळ अशा चार रुग्णांवरच उपचार केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयात सादर केले. चारपैकी तीन रुग्णांवर मे महिन्यात, तर एकावर जूनमध्ये उपचार करण्यात आले असून हे रुग्ण करोनाबाधित होते की नाही हे स्पष्ट नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

आर्थिकदृष्टय़ा मागास करोना रुग्णांकडून उपचार खर्च म्हणून १० लाख रुपये उकळल्याच्या आणि नफा कमावल्याच्या आरोपांची उच्च न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच के. जे. सोमय्या धर्मादाय रुग्णालयावरील आरोपांच्या चौकशीचे आदेश देत त्याचा अहवाल सादर करण्यास धर्मादाय आयुक्तांना सांगितले होते.

धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर केला नसला तरी प्रतिज्ञापत्र सादर केले. टाळेबंदीच्या काळात रुग्णालयाने आर्थिकदृष्टय़ा मागास रुग्णांसाठी २० खाटा राखून ठेवल्या होत्या. मात्र गेल्या दोन महिन्यांत केवळ चारच आर्थिकदृष्टय़ा मागास रुग्णांवर उपचार केले. असे असले तरी रुग्णालयाने या काळात कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास नकार दिलेला नाही, असेही धर्मादाय आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीत राहणाऱ्या सात याचिकाकर्त्यांनीही रुग्णालयात उत्पन्नाची माहिती सादर केली नव्हती, असेही धर्मादाय आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.