News Flash

कॅम्पाकोलाचे चारच रहिवासी आमरण उपोषणावर राहुल गांधींचीही भेट

कॅम्पाकोला कंपाऊंडमधील अनधिकृत घरे वाचवण्यासाठी तेथील रहिवासी आमरण उपोषणाला बसले आहेत. सर्वच पक्षांच्या राजकीय

| November 6, 2013 12:58 pm

कॅम्पाकोला कंपाऊंडमधील अनधिकृत घरे वाचवण्यासाठी तेथील रहिवासी आमरण उपोषणाला बसले आहेत. सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे उंबरे झिजवल्यानंतरही अपेक्षित निर्णय होत नसल्याने आता रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे. मात्र १४० कुटुंबांतील फक्त चौघांनीच उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याच वेळी काही रहिवाशांनी राहुल गांधींची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना गळ घालण्याचीही विनंती केली आहे.
कॅम्पाकोलातील अनधिकृत घरे पाडल्यास त्याचा १४० घरांना व सुमारे सहाशे रहिवाशांना फटका बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिलेली मुदत ११ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.  शेवटचा पर्याय म्हणून कपूरचंद जैन, विनयचंद हिरासत, सुरेंद्र दागा आणि कमल पारिख सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. सोबत मुले व इतर रहिवासी साखळी उपोषण करीत आहेत. पालिका व राज्य सरकार एकमेकांकडे विषय टोलवत असून आम्हाला कोणाकडूनही काहीच आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आता हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, असे आशीष जालान यांनी सांगितले.
सोमवारी काही रहिवासी राहुल गांधी यांना जाऊन भेटले. मुख्यमंत्र्यांना याबाबतीत लक्ष घालण्यास सांगण्याचे आश्वासनही दिले, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाऊबीजेनिमित्त मंत्रालयाला सुट्टी असल्याने मुख्यमंत्र्यांकडून भेटीची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. ‘१४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना सादरीकरण केल्यानंतर पुढे कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयाची मुदत संपत आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे,’ असे नंदिनी मेहता म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 12:58 pm

Web Title: only four residents keep fast unto death of campa cola
Next Stories
1 पित्यानेच बलात्कार करून मुलीची हत्या केली
2 ‘एकात्मिक झोपु वसाहतीसाठी ७० टक्क्यांची अट नको’
3 तीन आरोपी गजाआड
Just Now!
X