शैलजा तिवले

पायलने तिला होणारा त्रास अनेकदा व्यक्त केला होता. मात्र त्या तिघींच्या करिअरला पूर्णविराम मिळू नये, यासाठीच त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे टाळले. हीच घोडचूक ठरली, अशा शब्दांत डॉ. पायल तडवी (२६) यांचे पती डॉ. सलमान यांनी खंत व्यक्त केली.

सुरुवातीला वसतिगृहातील खोलीत आणि नंतर कामाच्या ठिकाणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन वरिष्ठ डॉक्टरांनी तिचा सातत्याने छळ केल्याचा आरोप आहे. सहा महिने त्रास सहन केल्यावर मात्र पायलने तिचा नवरा आणि कूपर रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. सलमान तडवी यांना याबाबत सांगितले. विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर यांच्याकडे डॉ. सलमान यांनी पायलची अवस्था व्यक्त केली. त्या वेळी त्यांनी पायल सर्वात प्रामाणिक आणि योग्य रीतीने काम करत असल्याचे कौतुक केले. त्यामुळे ती काम नीट करत नव्हती आणि तिच्यावर कामाचा ताण असल्याचा या तिन्ही डॉक्टरांनी केलेला आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे डॉ. सलमान यांनी सांगितले.

‘‘सकाळी सात वाजल्यापासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ती कामात व्यग्र असायची. तिला वेळ देता यावा म्हणून मी महालक्ष्मीला भाडय़ाने घर घेतले होते. कधीतरीच तिला घरी यायला जमत असे. पहिल्या वर्षी खूप काम असतेच, अशी मी तिची समजूत घालायचो. १ मेपासून पहिल्या वर्षांची मुलगी तिच्या युनिटला रुजू झाली; परंतु तिची कामेही तिघी जणी पायललाच सांगू लागल्या. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया किंवा प्रसूती करण्यापासून तिला अडवणूक केली जात होती. पहिल्या वर्षांच्या मुलीला मात्र सर्व शिकण्यास दिले जात होते’’, असे डॉ. सलमान यांनी सांगितले.

पायलच्या गेल्या काही दिवसांत होत असलेल्या घुसमटीबाबत डॉ. सलमान यांनी सांगितले की, ‘‘माझ्या वडिलांची हृदयशस्त्रक्रिया झाल्याने गेले १५ दिवस त्यांच्या सेवेत होतो. त्यामुळे मला तिला पुरेसा वेळ देणे शक्य झाले नाही. तिची आई मुंबईत येऊन तिच्या युनिट प्रमुखांना भेटल्याचेही मला माहीत नव्हते. ही घटना घडली त्या दिवशीच मी बाबांना जळगावला पोहोचवून मुंबईत परतलो होतो. गेल्या १५ दिवसांत तिला पुरेसा वेळ दिला असता तर कदाचित ही वेळ आली नसती’’, अशी खंतही डॉ. सलमान यांनी व्यक्त केली.

मी स्वत: साहाय्यक प्राध्यापक असल्याने अधिष्ठात्यांकडे जाऊन या तिन्ही डॉक्टरांची चौकशी करायला लावणे शक्य होते. मला वाटायचे, आज ना उद्या हा त्रास संपेल. एकदा नाव घेतले की तिघींच्या करिअरला खीळ बसेल. या विचारातून मी परिस्थिती सुधारण्याची वाट पाहिली आणि हीच माझी घोडचूक ठरली, असे सांगताना डॉ. सलमान यांचे डोळे पाणावले.

हत्येचा आरोप

‘‘घटनेच्या दिवशी शस्त्रक्रियागृहामध्ये या तिघी जणी तिला मोठमोठय़ाने ओरडत असल्याचे युनिटमधील डॉक्टरांकडून समजले. त्यानंतर काहीच वेळात पायल खोलीमध्ये गेली आणि रडली. छळ असह्य़ झाल्याने तिने आईला फोन केला. त्यानंतर काही तासांत ही घटना घडली. या घटनेनंतर तिच्या खोलीपर्यंत या तिघी जणी तात्काळ कशा पोहोचल्या’’, असा सवाल डॉ. सलमान यांनी उपस्थित केला. सुरक्षारक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर बराच काळ त्या तिथेच होत्या. पायलने लिहिलेली कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. या तिघींनीच सर्व पुरावे नष्ट केले असून तिची हत्या केल्याचा आरोप डॉ. सलमान यांनी केला आहे.