वरळी, प्रभादेवी, परळ लालबाग या भागात अधिकतर ज्येष्ठ नागरीक करोनामुक्त झाल्याचे प्रतिपिंड चाचणीतून निदर्शनास आले आहे. परिणामी बीसीजी लशीच्या चाचण्यांसाठी १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात यातील एक तृतीयांश जण लस टोचण्यासाठी पात्र ठरले आहेत.

करोनाबाधितांमध्ये ६० वर्षावरील व्यक्तींना सर्वाधिक धोका असल्याचे जगभरात दिसून आले आहे. या वयोगटात आजाराची गंभीर लक्षणे असून मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. क्षयरोगापासून प्रतिबंधासाठी म्हणून नवजात बालकाला टोचली जाणारी बीसीजी लस करोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी आहे का? याची पडताळणी करण्यासाठी भारतीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) ज्येष्ठांवर या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. जेष्ठ नागरिकांमधील करोनाचा संसर्ग, तीव्रता आणि मृत्यदर कमी करता येईल, याची चाचपणी यात केली जाणार आहे. चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, जोधपूर, नवी दिल्ली या शहरांमध्ये हा अभ्यास सुरू आहे.

मुंबईत पालिका आणि केईएम रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्टमध्ये या चाचण्या सुरू झाल्या. वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागात व परळ, लालबागचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभागात हा अभ्यास करण्यात येत आहे. लस टोचून घेण्यासाठी आत्तापर्यत १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र यातील एक तृतीयांश जण लस टोचण्यासाठी पात्र ठरले आहेत. यातील कोणालाही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत, असे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी ड़ॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांच्या प्रतिपिंड आणि क्ष किरण चाचणी केली जाते. १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी झाली असली, तरी यातील बहुतांश जणांना करोनाची बाधा होऊन गेल्याचे प्रतिपिंड चाचणीतून निर्दशनास आले आहे. करोनाचा उद्रेकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जी दक्षिण आणि एफ दक्षिण या भागात संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. या काळात ६० वर्षावरीलही अधिकतर बाधित होऊन गेले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच आत्तापर्यत दीडशेतील एक तृतीयांश जण  लस देण्याच्या टप्प्यापर्यत पोहचू शकले आहेत. नोंदणी अजूनही सुरू असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.

एफ दक्षिण विभागाचा समावेश असलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील बाधितांचे झोपडपट्टीत ४८ टक्के तर बिगर झोपडपट्टीत१३ टक्के आढळले आहे. ही लस दिल्यानंतर तेथे फोड येतो. तो फुटल्यावर तिथे चांदणी आकाराचा डाग दिसतो. या प्रक्रियेला साधारणपणे पाच ते सहा आठवडे लागतात. तीन महिन्यांनी या नागरिकांची पुन्हा करोना चाचणी केली जाईल. सहा महिन्यांनी पुन्हा एकदा करोना आणि क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे, असे सहा महिने यांचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.

मुंबईत २५० जणांवर हा अभ्यास करण्यात येणार असला तरी देशभरातील १४०० पर्यत नोंदणी होण्याची शक्यता असल्याने बहुतांशी या महिन्यापर्यत नोंदणी होईल, असा अंदाज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चार महिने चालणाऱ्या या चाचण्यांमध्ये देशभरात ६० ते ७५ वयोगटातील १४०० जेष्ठ नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. करोनाची बाधा झालेले, एचआयव्हीबाधित आणि कर्करुग्णांना यातून वगळण्यात आले आहे.