राफेल लढाऊ विमान खरेदी कराराबाबत रिलायन्सचे नाव भारतानेच सुचवल्याचा गौप्यस्फोट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी नुकताच केला आहे. त्यामुळे आता यावर मंत्रिमंडळातील इतर कोणीही नाही तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राऊत म्हणाले, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या गळाभेटीचे अनेक फोटो आम्ही पाहिले आहेत. मोदींच्या विनंतीवरुन ओलांद भारतातही आले होते. मात्र, आता खुद्द ओलांद यांनीच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याला उत्तर देण्याची सर्वस्वी जबाबदारी मोदींची असून याला अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन किंवा अर्थ सचिवांनी उत्तर देऊ नये स्वतः मोदींनीच यावर उत्तर द्यायला हवे.

दरम्यान, काँग्रेसने तर पहिल्यापासूनच राफेल कारारावरुन मोदी सरकारला पछाडून सोडले आहे. शनिवारी राफेल विमानांच्या करारांवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हा करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. एवढेच नाही तर मोदी सरकारने सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांचाही या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभाग होता असाही आरोप राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात भारतीय कंपनीची निवड करण्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती. करारासाठी कुठल्या भारतीय कंपनीला भागीदार म्हणून निवडायचे त्याचे पूर्ण स्वातंत्र्य फ्रेंच कंपनीला आहे असे फ्रान्स सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत सापडलेले असताना फ्रान्स सरकारने या करारातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.