आर्किटेक्चर अभ्यासक्रमाकरिता अकरावी-बारावीला ‘गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र’ हा विषयगट घेतलेल्या म्हणजे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेशाकरिता पात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आर्किटेक्चर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे, यापुढे या अभ्यासक्रमाकरिता कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अपात्र ठरतील. मात्र हा नियम २०१६-२०१७ व २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशांना लागू नाही. त्यानंतर २०१८-१९ला मात्र नव्या नियमानुसार केवळ विज्ञान शाखेचे विद्यार्थीच आर्किटेक्चर प्रवेशांना पात्र राहतील, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
आर्किटेक्चर अभ्यासक्रमाकरिता सुरुवातीला केवळ विज्ञान शाखेचे विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकत होते. दहा वर्षांपूर्वी कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश पात्र ठरविण्यात आले. केवळ त्यांनी गणित हा विषय अभ्यासलेला असावा, ही अट होती. परंतु, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाकरिता परिषदेने तयार केलेल्या नव्या नियमांनुसार केवळ ‘गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र’ हा विषयगट असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेशपात्र ठरविण्यात आले आहे. या विषयगटात बारावीला ५० टक्के गुण मिळविलेला विद्यार्थीच प्रवेशपात्र ठरेल. अर्थात या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांला ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ही द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे संस्थांमधील प्रवेश या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे होतील, असेही परिषदेने नव्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.
खासगी संस्थांत आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या जागा भरमसाठ वाढल्याने इतरही विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याची मागणी होऊ लागली. या दबावापुढे झुकून इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरचे दरवाजे खुले झाले. परंतु, इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर विज्ञान व गणिताशी संबंधित लहानसहान संकल्पना समजून घेतानाही झगडा करावा लागतो. त्यात त्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. त्यामुळे परिषदेने पुन्हा एकदा विज्ञान शाखेच्याच विद्यार्थ्यांना प्रवेशपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.