उत्तर भारतात गेला आठवडाभर बरसलेल्या पावसानंतरही देशभरातील पावसाचे प्रमाण सात टक्क्य़ांनी कमी राहिले. त्यातच मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६ टक्क्य़ांनी कमी आहे. या आठवडय़ात मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्याला मात्र पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
जूनच्या अखेरीस पावसाने सरासरीपेक्षा १५ टक्के चांगली कामगिरी करूनही जुलैमध्ये पावसाने अनेक भागात दडी मारल्याने सरासरी सात टक्क्य़ांनी नोंदली गेली. हिमालयाच्या पट्टय़ात गेल्या आठवडय़ाभरात दमदार पाऊस झाल्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश या वायव्य भागात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा चार टक्के पाऊस कमी पडला. मात्र कमी पावसाचा सर्वात जास्त फटका मध्य व दक्षिण भारताला बसला आहे. या दोन्हीकडे अनुक्रमे १६ व १४ टक्के कमी पाऊस पडला आहे. देशातील १२ टक्के भागात २० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस पडला असून ६७ टक्के भागात सरासरीएवढय़ा पावसाची व ११ टक्के भागात २० टक्क्य़ांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील पंधरा दिवसांचा पावसाचा अंदाज पाहता देशभरात जुलैच्या सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
जुलैमध्ये सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला होता, तर खासगी स्कायमेट या खासगी संस्थेने जुलैमध्ये १०४ टक्के पावसाची खात्री दिली होती.
जुलैच्या पुढील पंधरवडय़ात पावसाचा जोर काहीसा वाढणार असला तरी तो सरासरीएवढी मजल मारण्याची शक्यता सध्या दिसत नाही. सध्या राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने मध्य प्रदेशमध्ये तसेच २१ व २२ जुलै रोजी गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात कोकणातही पावसाचा जोर वाढेल मात्र राज्याच्या इतर भागांना पावसाची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागेल.

१७ जुलैपर्यंतची कामगिरी

पूर्व व ईशान्य भारत – वजा चार टक्के
वायव्य भारत – १४ टक्के
मध्य भारत – वजा १६ टक्के
दक्षिण भारत – वजा १४ टक्के
संपूर्ण देश – वजा सात टक्केम
मध्य भारत – वजा १६ टक्के
दक्षिण भारत – वजा १४ टक्के
संपूर्ण देश – वजा सात टक्के