महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्कच उभे राहील. त्यामुळे मुंबईच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.
मुंबईतील ओळख खुणांपैकी एक आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भायखळा येथील प्रसिद्ध शेट करसेटजी माणेकजी (खडा पारसी) पुतळ्याचे महापालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात आले असून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचेच पुतळे या शहरात उभारायला हवेत. रेसकोर्सवरील थीम पार्कमध्ये अशा व्यक्तींचे पुतळे उभारण्यात येतील. थीम पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांना या व्यक्तींचा इतिहास समजेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेट करसेटजी माणेकजी हे त्यावेळी पारसी समाजाचे प्रमुख म्हणून ओळखले जात होते. त्यांचे धाकटे पुत्र न्यायमूर्ती माणेकजी करसेटजी यांनी एका ठिकाणी प्रदर्शनीय कारंजा पाहिला आणि त्यांनी २० हजार रुपये खर्च करून आरंजासह शेट करसेटजी माणेकजी यांचे स्मारक उभारले. मूळ रोमन ध्यान देवतेऐवजी त्यांनी त्यांच्या वडिलांचा पुतळा डॉन बेल यांच्यामार्फत उभारला. हे स्मारक खडा पारसी म्हणून प्रसिद्ध झाले. १५० वर्षे पुरातन असलेले हे स्मारक बीड, ब्रांझ धातूपासून साकारण्यात आले आहे. स्मारकाच्या भोवती उड्डाणपूल असल्याने ते स्पष्ट दिसत नव्हते. चार मोठे दिवे व त्यांचे ब्रँकेट कोरीन्थिअन खांबापासून माहीसे झाले होते. चार अतिरिक्त दिवे कारंजाच्या पायापासून नाहीसे झाले होते. तळाशी असलेले कारंजे सभोवतालच्या पदपथामध्ये बुजले होते. स्मारकाचे सांधे तुटले होते.
सभागृह नेतेपदी असताना सुनील प्रभू यांनी या स्मारकाच्या पुतळ्याची दुरुस्ती, पुनर्रचना, पुनस्र्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पालिकेने हे काम हाती घेतले होते. या कामासाठी सल्लागार म्हणून पंकज जोशी कन्सल्टंट यांची तर कंत्राटदार म्हणून आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्टस् या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.