मुंबई परिसरातील रेल्वेच्या उपनगरी सेवेने ठाण्यापलिकडच्या प्रवाशांवर कायमच अन्याय केला असून आता राज्य शासनातर्फे मिळणाऱ्या रुग्णवाहिका सुविधेतही हाच दुजाभाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून अद्ययावत ४०० रुग्णवाहिका उपलब्ध करून देणाऱ्या राज्य शासनाने त्यातील ५३ रुग्णवाहिका रेल्वे प्रशासनाला दिल्या असल्या तरी त्यापैकी अवघ्या दोन रुग्णवाहिका ठाणे-बदलापूर परिसरातील प्रवाशांच्या वाटय़ाला आल्या आहेत. त्यातील एक ठाण्यात तर दुसरी डोंबिवलीला असणार आहे. आश्चर्य म्हणजे देशातील महत्त्वाचे जंक्शन स्थानक असणाऱ्या कल्याण स्थानकाला ही रुग्णवाहिका सेवा देण्यात आलेली नाही. ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांतून हे वास्तव उघड झाले आहे.
प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असूनही त्या तुलनेत उपनगरी सेवांमध्ये वाढ झालेली नाही. परिणामी या मार्गावरील उपनगरी प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक जिकिरीचा होऊ लागला आहे. अपुऱ्या ट्रेन्स आणि वाढत्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षभरात केवळ कल्याण स्थानकात ५४६ अपघात झाले. दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकांतही अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार ठाणे-डोंबिवली वगळता या मार्गावरील इतर स्थानकांमध्ये गरजेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र ती मिळविण्याची प्रक्रिया किचकट आहे. ‘पोलीसाची पाहणी, स्टेशन मास्तरांची अनुमती व नंतर रुग्णवाहिका’ यात अर्थातच अपघातग्रस्त प्रवाशास उपचार मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे गर्दीच्या सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांमध्ये रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असायला हवी, असे मत सुयश प्रधान यांनी व्यक्त केले आहे.

‘मरे’स सापत्नपणाची वागणूक
राज्य शासनाने रेल्वे प्रशासनास ५३ रुग्णवाहिका दिल्या असल्या तरी नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळणाऱ्या मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या वाटय़ास त्यातील फक्त १८ येणार आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्यापैकी सहा उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्या स्थानकात रुग्णवाहिका ठेवायची याची निवडही राज्य शासनाने केली आहे.