अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात पुनर्वसनाचा अडथळा; म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची मर्यादा उघड

शहर आणि उपनगरातील मुंबई महापालिकेच्या अतिधोकादायक अशा ४९९ आणि तातडीने पुनर्रचना आवश्यक असलेल्या म्हाडाच्या सहा हजार उपकरप्राप्त इमारती रिकाम्या करायच्या ठरल्या तर येथील हजारो रहिवाशांचे पुनर्वसन करण्याकरिता म्हाडाकडे अवघ्या दोन हजार सदनिकाच आहेत. त्यामुळे पालिकेतल्या यादीतील बहुसंख्य इमारती या खासगी असल्या तरी रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची पाळी आली तर  म्हाडाला ते अशक्य आहे.

अतिधोकादायक इमारतींची माहिती उच्च न्यायालयानेही मागविली आहे. शहरातच नव्हे तर पूर्व व पश्चिम उपनगरातही अतिधोकादायक इमारतींची संख्या लक्षणीय आहे. अशा इमारतींची सी-एक अशी श्रेणी तयार करून स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत दक्षिण व मध्य मुंबईत ७७ इमारती आहेत. पश्चिम उपगरात २३३ तर पूर्व उपनगरात १५६ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील ३२ इमारतीही पाडण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व इमारती प्रामुख्याने खासगी मालकांच्या आहेत. त्यामुळे या रहिवाशांच्या पर्यायी व्यवस्थेची थेट जबाबदारी नसली तरी या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाडय़ाने संक्रमण शिबिरे मागितली गेल्यास म्हाडाकडे संक्रमण शिबिरांतील फक्त दोन हजार सदनिका उपलब्ध असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

म्हाडामार्फत सध्या दक्षिण मुंबईत १८०० संक्रमण सदनिकांचे काम पूर्ण करण्यात आले आहेत. दक्षिण व मध्य मुंबईतील रहिवाशांना जवळपास संक्रमण सदनिका हव्या असतात. एका अंदाजानुसार, अतिधोकादायक इमारती रिक्त केल्या गेल्या तर चार ते पाच हजार रहिवाशांना पर्यायी घर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. मात्र १८०० सदनिका वगळता म्हाडाकडे सध्या तरी रिक्त सदनिका नाहीत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. काही सदनिका उपनगरात गोराई येथे आहेत. याशिवाय पूर्व उपनगरात विक्रोळीत काही प्रमाणात सदनिका उपलब्ध आहेत. मात्र ही संख्या जेमतेम दोनशेच्या घरात पोहोचेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या सर्व इमारती पाडण्याची पाळी आल्यास या रहिवाशांची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्नही निर्माण होणार आहे.

इमारती पाडणार

मुंबईमधील २३ अतिधोकादायक इमारती पाडण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे पालिका या इमारती रिकाम्या करून पाडणार आहे. या धोकादायक इमारती गिरगाव, वरळी, डोंगरी, परळ, अंधेरी, गोरेगाव, मुलुंड आदी भागात आहेत.

म्हाडाकडे रिक्त असलेल्या संक्रमण सदनिकांची संख्या फक्त ४०० ते ४५० आहे. नव्याने येऊ घातलेल्या १८०० संक्रमण सदनिकाही अपुऱ्या पडणार आहेत. अशा वेळी संबंधित रहिवाशांना त्यांच्या परिसरातील दरानुसार भाडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे काही समस्या निर्माण होईल असे वाटत नाही.

– अविनाश गोटे, सह मुख्य अधिकारी, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ