करोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका फक्त महिलांसाठी राखीव असं विशेष लसीकरण सत्र राबवणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी (१७ सप्टेंबर २०२१) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका करोना लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाईल. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन करोना प्रतिबंधक लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेता येणार आहे. ह्या विशेष सत्राकरिता उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत उद्याचा दिवस महिला लसीकरणासाठी राखीव दिवस आहे. कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण जास्तीत जास्त वेगाने आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरात विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव विशेष कोविड प्रतिबंधक लसीकरण सत्र १७ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० ह्या वेळेत राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील ह्या सत्रात दिली जाणार आहे. म्हणूनच, उद्या लसीकरणाची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त जणांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी असे उपक्रम निश्चित महत्त्वपूर्ण ठरू शकतील