‘लोकसत्ता’तील वृत्तानंतर पालिकेला जाग; अजूनही काही ठिकाणी गटारे उघडीच

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या पूर्व उपनगरातील अनेक गटारांवर झाकणेच नसल्याने ती मृत्यूची दारे कशी बनली आहेत. ‘लोकसत्ता’ने ५ जुलैला याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेने काही गटारांवर झाकणे लावली. मात्र अद्यापही काही ठिकाणी गटारे उघडीच आहेत.

मुंबई महानगरपालिका दरवर्षी गटारांच्या बांधकामासाठी करोडो रुपये खर्च करते. मात्र कंत्राटदारांकडून गटारांवर टाकण्यात येणारी झाकणे निकृष्ट दर्जाची वापरली जात असल्याने दोन ते तीन महिन्यांतच ही झाकणे तुटतात. अनेकदा या झाकणांची गर्दुल्ले चोरी करत असल्याने पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी ही गटारे उघडी पडली आहेत. पालिकेच्या एम पूर्व भागात सर्वाधिक झाकणे गायब असल्याचे चित्र पाहायला मिळते.  ७ जूनला अशाच एका गटारात पडून ट्रॉम्बे परिसरातील चिता कॅम्प येथे अदीन तंबोली या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी येथेदेखील दिनेश जाटोपलिया (वय २३) या तरुणाचा २३ जूनच्या रात्री उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनांनंतरही उघडय़ा गटारांचा प्रश्न जैसे थेच आहे. ‘लोकसत्ता मुंबई’ने या प्रश्नावर प्रकाश टाकत पूर्व उपनगरात ‘रस्तोरस्ती मृत्यूची दारे’ या मथळ्याखाली ५ जुलैला वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या पालिकेने पूर्व उपनगरातील मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी शिवाजी नगर येथील अनेक उघडय़ा गटरांवर झाकणे लावली आहेत. मात्र, पूर्व द्रुतगती मार्गावरील गरोडिया नगर आणि मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील अनेक गटारांवर अद्यापही झाकणे लावलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होण्याआधी पालिकेने यावर झाकणे बसवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

गटाराचे काम नव्याने

चेंबूरच्या लोखंडे मार्गावरील राहुल नगर येथील उड्डाणपुलाखाली संपूर्ण गटारच उघडे होते. या रस्त्यावरून नेहमीच शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. या गटाराचे छायाचित्र ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर चार दिवसातच पावसाळा सुरू असतानादेखील पालिकेने हे संपूर्ण गटारच खोदून या ठिकाणी नव्याने गटार बांधण्यास सुरुवात केली आहे.