वाडीबंदरमध्ये कारवाई; २ तस्कर अटकेत; सात पोलीस जखमी; तीनदा गोळीबार
सीएसटीच्या वाडीबंदर परिसरात नायजेरियन अमली तस्करांच्या कारवाईंना वेसण घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी धाडसी कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. तब्बल ८० पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी तस्करांची धरपकड करण्यासाठी केलेल्या थरारक कारवाईत सात पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यात दोन नायजेरिनना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांना विरोध करण्यासाठी या तस्करांनी पेव्हरब्लॉक, रेल्वे रुळांतील दगड यांनी हल्ला चढविल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांना तीन वेळा गोळीबार करावा लागला. सीएसटी ते भायखळा दरम्यान तब्बल पाच तास या कारवाईचा थरार सुरु होता.
वाडीबंदर परिसरात नायजेरीयन तस्करांचा सततचा वावर असून त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचली होती. गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी शाखेने या परिसरात तस्करांवर वारंवार कारवाईही केली होती. परंतु, तस्करांचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. अखेर, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तस्करांना धडा शिकविण्यासाठी ‘ऑपरेशन सबक’चे नियोजन सुरु केले. आठवडाभरापासून या कारवाईची तयारी सुरु झाली होती. संपूर्ण परिसराचा अभ्यास करुन तस्करांची वावरण्याची जागा, त्यांच्या येण्याजाण्याचे मार्ग याचा अभ्यास करुन नियोजन करण्यात आले होते. शारिरीकदृष्टय़ा सक्षम असलेल्या या तस्करांना गरज पडल्यास बळाचा वापर करुन ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेतील ८० तगडे पोलीस अधिकारी-कर्मचारी निवडण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीपासून काही पोलिसांनी परिसरात वेषांतर करुन गस्त घालण्यास सुरुवात केली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली.
पोलीस आल्याचे पाहताच सर्व तस्कर बिथरले, पोलिसांनी तस्करांच्या म्होरक्याला पकडल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी इतर नायजेरिन पोलिसांवर धावून गेले. त्यातील एकाने पोलीस निरिक्षक संतोष बागवे यांना पकडत त्यांचा चेहरा दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक बागवे यांनी हा हल्ला शिताफीने चुकवत प्रतिकार केला. दुसरीकडे रस्ताच्या कडेला पडलेले पेव्हरब्लॉक, जवळच्या रेल्वे रुळांतील दगड यांचा वर्षांव तस्करांनी पोलिसांवर सुरु केला. अखेर, पोलिसांनी तीनदा हवेत गोळीबार करुन तस्करांना इशारा दिला.
पोलिसांपुढे आपला निभाव लागणार नाही असे समजल्यावर नायजेरिननी पळ काढण्यासाठी रेल्वे रुळांचा आधार घेतला. काही तस्कर थेट भायखळ्यापर्यंत रुळांतून पळत गेले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु, अंधाराचा आणि रेल्वेच्या रहदारीचा फायदा घेऊन निसटण्यात नायजेरियन यशस्वी ठरले. पहाटे चार वाजेपर्यंत ही मोहिम सुरु होती. तस्करांचा स्थानिकांना होणारा जाच मोडून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून यात आम्ही यशस्वी ठरल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. कारवाईत सात पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले असून इक्वे इमॅनियल (२४) आणि इफुनान्या मिनिके (३१) दोन नायजेरीयना पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण ४० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. इक्वे इमॅनियल या तस्करांचा म्होरक्या असून तो २०१५ मध्ये तस्करीसाठीच शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे.
यापुढेही तस्करांना बेडय़ा ठोकण्यासाठी सातत्याने अशाप्रकारे मोहिम राबवून असून शहरातील तस्करीचे जाळे मोडून काढण्यात येणार असून तस्करांना आवर घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही सहआयुक्त कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद ?
वाडीबंदर येथील तस्करांच्या सुळसुळाटावर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. स्थानिक पोलीस, अमलीपदार्थ विरोधी शाखा तस्करांचा बिमोड करण्यात अपयशी ठरल्याने गुन्हे शाखेकडे कारवाईची सूत्रे सोपविण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना स्थानिक पोलिसांनाही त्याविषयी कळविण्यात आले नाही. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच तस्करांनी आपल्या व्यापाराचे बस्तान वाडीबंदर परिसरात बसवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तर अनेक स्थानिक नागरिकही तस्करांकडून चार-दोन हजार रुपये मिळत असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.