नोकऱ्यांच्या संधी, उलाढाल काहीशी थंडावलेली असताना ‘आयआयटी बॉम्बे’च्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आशादायक स्थिती आहे. मुलाखतपूर्व संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून यंदा १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या हाती कॅम्पस मुलाखती सुरू होण्यापूर्वी नोकरीचा प्रस्ताव आहे.
देशभरातील आयआयटी १ डिसेंबरपासून कॅम्पस मुलाखती सुरू करत असून त्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांनी प्रस्तावही दिले आहेत. आयआयटी बॉम्बेतील १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कंपन्यानी प्रस्ताव दिले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या वाढली आहे.
यंदा कॅम्पस मुलाखती पूर्णपणे ऑनलाइन होणार आहेत. आयआयटी बॉम्बेमध्ये होणाऱ्या कॅम्पस मुलाखतींसाठी आतापर्यंत साधारण २७० कंपन्यांनी नोंदणी केली आहे, तर दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा अमेरिकेतील कंपन्यांची संख्या अधिक आहे.
‘यंदाच्या बदलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या संधी काही वेगळ्या असू शकतील. काही क्षेत्रात नव्याने संधी निर्माण होतील. मात्र, विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील,’ असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 12:15 am