आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी घेण्यात येणारी दुसऱ्या टप्प्यातील सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई अ‍ॅडव्हान्स) देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येणार आहे.

देशभरात २७ सप्टेंबर रोजी जेईई मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जेईई अ‍ॅडव्हान्स घेण्यात आली. मात्र, या करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली होती. आयआयटीच्या सामाईक प्रवेश मंडळाने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला नसला तरी यंदा जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी करून प्रत्यक्ष परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी अ‍ॅडव्हान्स देण्याची संधी दिली आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी पुन्हा मुख्य परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. यंदाच्या मुख्य परीक्षेच्या पात्रतेच्या आधारे त्यांना पुढील वर्षी अ‍ॅडव्हान्स देता येईल असा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर यामुळे पुढील वर्षी मुख्य परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात बदल करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.