अ‍ॅपच्या माध्यमातून ‘आभासी’ होळी खेळण्याची संधी

नमिता धुरी, मुंबई</strong>

सध्या कोणताही सण वा उत्सव असला की, त्याला पूरक असे मोबाइल अ‍ॅप किंवा गेम लगेच प्लेस्टोअर, अ‍ॅप स्टोअरवर झळकू लागतात. यंदाच्या होळीतही तो प्रकार पाहायला मिळत असून मोबाइलवर उपलब्ध झालेल्या होळीच्या गेमच्या माध्यमातून बसल्याजागी रंगांची उधळण करण्याची संधी वापरकर्त्यांना मिळणार आहे. ‘होली वॉटर वॉर्स – बलून फाइट’, ‘गोपी डॉल होली सेलिब्रेशन’, ‘लेट्स प्ले होली’, ‘लेट्स प्ले होली २ गेम’, ‘कृष्णा वॉटर बलून फाइट’, ‘एस्केप हॅप्पी होली’, ‘होली बलून स्लाइस रश’, ‘सिटी कलर बूम – द होली गेम’, ‘होली’ इत्यादी गेम सध्या मोबाइल गेमच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

गेल्या महिन्यात नव्याने लॉन्च झालेल्या ‘होली वॉटर वॉर्स..’ गेममध्ये रंगांचे फुगे मारणारा एक मुलगा आणि पिचकारीने रंगीत पाणी उडवणारी एक मुलगी देण्यात आली आहे. फुग्यात पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप आहे. या गेममध्ये फुगे मारून समोरून येणाऱ्या शत्रूला अडवावे लागते, अन्यथा तो फुगे मारणाऱ्या मुलापर्यंत पोहोचतो. ‘सिटी कलर बूम..’मध्ये पॅराशूटमध्ये बसून एक मुलगा पूर्ण शहरात फिरत आहे. जमिनीवरून चालणाऱ्या माणसांवर आकाशातून फुगे फेकण्यासाठी त्याला मदत करायची आहे. या दोन्ही गेम आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड झाले आहेत.

‘एस्के प हॅप्पी होली’ या खेळात एका मुलाला होळी खेळायला जायचे आहे. विविध कोडी सोडवत, अडथळे पार करत त्याला इमारतीतून बाहेर काढायचे आहे. ‘होली बलून..’ या गेममध्ये स्क्रीनवर रंगीत पाण्याने भरलेले फुगे एकामागून एक येत राहतात. त्यांच्यात काही बॉम्बही असतात. बॉम्ब आणि इतर अडथळे बाजूला सारून नेमके  रंगांचे फुगे ओळखून ते फोडायचे आहेत. आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांनी हे गेम्स डाऊनलोड केले आहेत.

५० हजारांहून अधिक डाऊनलोड असलेल्या ‘कृष्णा वॉटर..’ गेममध्ये बालकृष्णाच्या हातात पिचकारी आहे. तो राक्षसांना लक्ष्य करत त्यांच्यावर पिचकारीतील फुगे मारतो. सर्व राक्षसांना मारल्यास त्यांच्या ताब्यात असलेल्या राधापर्यंत कृष्णाला पोहोचता येते. ‘गोपी डॉल..’ हा असाच एक गेम असून तोही पाच लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.

‘लेट्स प्ले होली’ या गेममध्ये असलेल्या इमारतीच्या खिडक्या अधूनमधून उघडतात.

नेमके  त्याचवेळी पिचकारीवर क्लिक करून आतील माणसांवर रंग उडवायचा आहे. होळी खेळताना नुसताच माणसांना रंग न लावता शेजाऱ्यांच्या घरांच्या भिंती रंगवण्याची सवयही अनेकांना असते. ही हौस भागवण्यासाठी ‘होळी’ हा गेम उत्तम पर्याय आहे.

यात रंगांनी भरलेल्या बादल्या भिंतीवर मनसोक्तरीत्या करता येतील. या तिन्ही खेळांना १ लाखांहून अधिक डाऊनलोड्स मिळाले आहेत.

आधी आम्ही होळीचे काही गेम्स पाहिले आणि त्यापेक्षा वेगळे काय देता येईल याचा विचार केला. इंजिनीअरिंग आणि अ‍ॅनिमेशन या दोन्ही क्षेत्रांतील शिक्षणाचा उपयोग ‘होली वॉटर वॉर्स – बलून फाइट’ गेम बनवताना झाला. ‘प्लांट वर्सेस झोंबी’ या आंतरराष्ट्रीय गेमवर आधारीत हा गेम आहे. 

– निखिल मालनकर, गेम ई ऑन