News Flash

भ्रष्टाचारावरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक

युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधान परिषदेत घोषणाबाजी करीत बुधवारी सभागृहाचे कामकाज रोखून धरले.

| July 30, 2015 04:34 am

युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधान परिषदेत घोषणाबाजी करीत बुधवारी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. या मागणीवरून गोंधळ सुरू झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. उद्याही याच प्रश्नावर सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांनी तयारी केली आहे.
प्रश्नोत्तरे व लक्षवेधी सूचनांवरील कामकाज पार पडल्यानंतर, काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर विरोधी पक्षांच्या वतीने जो प्रस्ताव दिला आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी नियम २८९ चा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरील प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे, त्याशिवाय कोणतेही कामकाज घेऊ नये, असा आग्रह त्यांनी धरला. पीठासीन अधिकारी दिलीपराव साळुंखे यांनी विधेयके चर्चेला घ्यायची आहेत, असे सांगून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दोन प्रस्तावांवरील वाद
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्षांनी युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. याच मुद्दय़ावरून सुरुवातीचा आठवडा गाजला. त्यानंतर गेल्या शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी सदस्यांनी महिला व बालविकास विभागाने निविदा न मागविता केलेली १६६ कोटी रुपयांची चिक्की खरेदी, शालेय शिक्षण विभागातील अग्निशमन यंत्रांची खरेदी, त्यात झालेला गैरव्यवहार, त्यावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु त्या वेळी त्यावर चर्चा झाली नाही. आजच्या कामकाज पत्रिकेत दुसऱ्या क्रमाकांवर हा प्रस्ताव घेण्यात आला होता. तर सिंचनातील घोटाळ्याकडे अंगुलीनिर्देश करणारा सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव पहिल्या क्रमांकावर दाखविला होता. विरोधी पक्षांनी त्याला आक्षेप घेतला. विरोधी पक्षांचा प्रस्ताव आधी चर्चेला घेतला पाहिजे, अशी मागणी करीत त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. उद्या याच प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 4:34 am

Web Title: opposition aggressive for discussions on corruption
Next Stories
1 धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे
2 जात पडताळणी समित्या की छळछावण्या?
3 असे घडले अटकनाटय़..
Just Now!
X