भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शुक्रवारी विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी करीत विरोधकांनी घातलेल्या गोंधळास प्रत्युत्तर देताना तेलगीला पाठीशी घालणाऱ्या दलालांना अटक करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घातलेल्या या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
भाजपा-शिवसेना सरकारच्या आठ महिन्यांच्या कार्यकालात दर कराराच्या माध्यमातून झालेल्या विविध घोटाळ्यांबाबत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून गुरुवारी सभागृहात चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर शुक्रवारी चर्चा घेण्याची ग्वाही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली होती. कामकाज पत्रिकेतही प्रश्नोत्तरानंतर नियम २६० अन्वये विरोधकांचा हा प्रस्ताव चर्चेला येणार होता. मात्र त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करीत गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
आज बारा वाजता कामकाजास सुरुवात होताच, ‘भ्रष्ट मंत्र्यांनो राजीनामे द्या, गली गली में शोर है, भाजप-सेना चोर है, घोटाळेबाज सरकारचा धिक्कार असो’, असे फलक फडकावीत, घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून घोषणाबाजीला सुरुवात होताच सत्ताधाऱ्यांनीही बॅनर फडकावत कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविणाऱ्या छगन भुजबळ यांना अटक करा, तेलगीला पाठीशी घालणाऱ्या दलालांना अटक करा अशा घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. या गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कोणतेही कामकाज न होता विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

‘शुद्ध मनाने सभागृहात या’
सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब करावी लागली. सोमवारी आषाढी एकादशी असल्याने कामकाज होणार नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन मंगळवारी शुद्ध अंत:करणाने, शुद्ध मनाने सभागृहात यावे असा टोमणा तालिका सभापती दीपक साळुंखे-पाटील यांनी सर्व सदस्यांना उद्देशून हाणला.