मुंबई : कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ताब्यात घेतले.

दरम्यान, कितीही चौकशी केली गेली तरी मी बोलणे थांबवणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

या चौकशीतून फारसे काही बाहेर निघणार नाही, असे सांगत शिवसेनेने राज यांचे समर्थन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘ईडी’ची कारवाई हे दबावतंत्र असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, राज यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तथापि, राज यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचे तसेच ‘ईडी’च्या कार्यालय परिसरात न येण्याचे आवाहन केले होते. राज यांच्या चौकशीच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबईतील काही भागांत पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. एकीकडे राज यांची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू असताना त्यांची पत्नी शर्मिला यांच्यासह अन्य नातेवाईक ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर उभे राहून राज कधी बाहेर येणार याची वाट पाहात होते. ‘ईडी’च्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी अडथळे उभारले होते.