शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार अनुकूल नसल्याच्या निषेधार्थ विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालत विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी अभिरूप विधानसभा भरवून विरोधी सदस्यांनी सरकारचा मंगळवारी निषेध केला. फक्त कर्जमाफीच्या मुद्दय़ावर दिवसभर आक्रमक भूमिका घ्यायची हे ठरले असताना पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे गाजलेल्या ‘त्या’ वादग्रस्त चिक्कीचे वाटप करून राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुद्दय़ाला फाटा फोडल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काँग्रेस नेत्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर लागोपाठ दुसऱ्या दिवशी विधिमंडळात गदारोळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जमाफीचा मुद्दा मांडला, पण सत्ताधाऱ्यांनी कामकाज पुढे रेटण्यास सुरुवात केली. सुमारे २० मिनिटे विरोधी सदस्यांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत घोषणाबाजी, कागदांची फाडाफाडी केली, आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कामकाजावरच बहिष्कार घातला. दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर बसकन मारली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी साम्य असलेले मुंडे नावाचे राजकीय कार्यकर्ते तेथेच उपस्थित होते. त्यांना अध्यक्षस्थानी बसवून अभिरूप विधानसभेचे कामकाज सुरू झाले. मग अध्यक्ष बागडे, मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले. घोषणा, भाषणे सुरू झाली. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील या  साऱ्याच माजी मंत्र्यांवर मांडी घालून जमिनीवर बसण्याची वेळ आली होती. अभिरूप विधानसभेचा उत्साह मावळल्यावर जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार पंकजा मुंडे यांच्या खात्याने खरेदी केलेली सूर्यकांता कंपनीची चिक्कीची पाकिटे घेऊन दाखल झाले. या खरेदीवरूनच पंकजा मुंडे यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. आव्हाड आणि शिंदे यांनी पायऱ्यांवरच चिक्की खाण्यास सुरुवात केली.