धर्मा पाटील प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची विरोधकांची मागणी

धुळे जिल्ह्य़ातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाने राज्य सरकार पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाटील यांनी आत्महत्या केली नसून, सरकारनेच त्यांची हत्या केली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सरकारवरच ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून दोन्ही मंत्र्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीवरून अडचणीत आलेल्या सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

ऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादनात फसवणूक झाल्याने निराश झालेल्या धर्मा पाटील यांनी गेल्या आठवडय़ात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पाटील यांचे काल जे. जे. रुग्णालयात निधन झाले. यांच्या निधनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. मग त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. धर्मा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्र्याने प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी केली. आपले राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतली. मात्र त्याचवेळी धर्मा पाटीलसारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनाकडे हेलपाटे मारून अखेर मंत्रालयात विषप्राशन करावे लागते, हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे विखे पाटील म्हणाले.

न्यायासाठी लढणाऱ्या धर्मा पाटील यांचा मृत्यू नसून गेंडय़ाच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे. हा सरकारच्या क्रूरतेचा बळी असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.पाटील यांनी न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष केला, तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा असे वाटले नाही. या मृत्यूस केवळ सरकारच जबाबदार आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वावर ३०२चा गुन्हा दाखल करा, या प्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पासून ते जिल्हाधिकारी या सर्वाना निलंबित करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

धर्मा पाटील यांचा बळी ही राज्य सरकारसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना असल्याचे सांगत राज्य किसान सभेने सरकारचा निषेध केला आहे. मरणोत्तर तरी सरकारने पाटील यांना न्याय द्यावा आणि पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी केली आहे. राज्याच्या प्रशासनाच्या मुख्यालयात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब : अशोक चव्हाण</strong>

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. एका ८४ वर्षे वयाच्या शेतकऱ्याला न्यायासाठी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते, ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. पाटील जे.जे. रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होते पण मुंबईत असूनही मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करण्यास वेळ मिळाला नाही हे दुर्दैवी असून सरकारची असंवेदनशीलता दर्शवणारे आहे. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करताहेत. शेतकऱ्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागलेत. त्यांचा सरकारवर विश्वास राहिला नाही, त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचे चव्हाण म्हणाले.