उत्तराखंड दुर्घटनेत मरण पावलेले नागरिक व जवानांना विधान परिषदेत श्रद्धांजली अर्पण करताना जातीवाचक विधान करून महाराष्ट्राचा व सैनिकांचा अवमान करणाऱ्या शालेय शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्या माफीची मागणी करीत शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी उत्तराखंड महाप्रलयात मरण पावलेले भाविक-यात्रेकरू तसेच बचाव मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना फौजिया खान यांनी उत्तराखंडधील आपत्तीग्रस्तांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात असताना महाराष्ट्रातील भाषावाद व प्रांतवादाबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याचबरोबर परभणीत मुस्लिमांनी वर्गणी काढून आपत्तीग्रस्तांना मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी उत्तराखंड दुर्घटनेत नागरिकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या जवानांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र शिवसेनेचे गट नेते दिवाकर रावते यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून जातीवाचक विधान करुन महाराष्ट्राचा व जवानांचा अपमान करणाऱ्या फौजिया खान यांनी राजीनामा द्यावा किंवा अभिनंदनाचा ठराव मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर फौजिया खान यांचे नेमके काय विधान आहे ते तपासून त्याबाबत दोन दिवसांत आपण आपला निर्णय देऊ तसेच आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू असे आश्वासन उपसभापतींनी दिले.
सभागृहातील वातावरण तापू लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करून फौजिया खान यांचे विधान काय होते ते तपासून उपसभापती निर्णय देतील, असे सांगून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.