विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा विधान भवनाला घेराव घालण्यासाठी अखेर मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी पहाटे दाखल झाला आहे. सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांचा हा ज्वालामुखी सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने काल रात्री मंत्रिगट स्थापन केला. सरकार इतके दिवस काय झोपा काढ होते का, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.

हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकल्याने आता सरकारला जाग आली आहे. आता सरकार चर्चेचे निमंत्रण देत आहेत. हाच समजूतदारपणा त्यांनी आधी का नाही दाखवला, असा सवाल करत काहीही झाले तरी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

तत्पूर्वी, ‘शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक-मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडले होते.