विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा; मेट्रोसाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याची मागणी

सत्तेच्या सुसाट गाडीत बसलेल्यांना मागे धूळ किती उडते हे मागे वळल्याशिवाय दिसत नाही. काहीवेळा तुमचं भाषण पडलं तरी आजूबाजूचे भाषण किती छान झाले याचे कौतुक करतात. तुम्हाला सगळे चांगलेच चालल्याचे सांगितले जाते. पण तसे नसते. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेला तुम्हीच जबाबदार असून तुमच्या मागे उडणारी धूळच तुम्हाला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, असा सूचक इशारा विरोधकांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

विधानसभेत आज महसूल, कृषी, नगरविकास, वित्त आदी विभागांच्या अर्थसंकल्पीय मागण्याना मंजुरी देण्यात आली. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाचे काम ज्या गतीने सुरू आहे, तीच गती अन्य कामामध्ये का नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही केवळ सार्वजनिक बांधकाम विभागावरच अधिक लक्ष असून महसूल विभागात उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांना शेतीत काम केले तरी कोटय़वधी रुपयांच्या  गौण खनिज स्वामित्व धनाच्या नोटिसा पाठविल्या जात असून ही अवास्तव वसुली थांबवा अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. तहसील कार्यालयातच लोकांना मिळणाऱ्या प्रशासनाच्या प्रतिसादावरच सरकारची प्रतिमा ठरते असे सांगून थोरात म्हणाले, पूर्वी खरीप आणि रब्बी हंगामाच्या वेळी मुख्यमंत्री स्वत: प्रत्येक विभागात जाऊन स्थानिक अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करीत. त्यातून राज्यात कृषीची परिस्थिती काय आहे हे समजत असे. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून केवळ कृषीतील गुणनियंत्रण विभाग विकलांग झाल्याचा आरोपही त्यांनी केला.  कृषी विभागात अनेक जागा रिक्त असून तालुका कृषी अधिकाऱ्याच्या ६० टक्के जागा रिक्त असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

मुंबईत भविष्यात सुमारे ६५ लाख प्रवाशांना ने-आण करणाऱ्या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षित व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे. तसेच मुंबईतील मालमत्तांचे नोंदणी शुल्क हे चटईक्षेत्रानुसार आकारण्यात यावे आणि रेडी रेकनरचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी आशीष शेलार यांनी केली.