मुंबई : अंधेरी येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची असल्याचे वक्तव्य करीत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ही वेळ मदतकार्याची असून परस्परांवर टीका-टिप्पणी करण्याची नाही, असा प्रतिटोला भाजप आमदारांनी लगावला. पालिकेतील विरोधी पक्षांनीही सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

‘पालिकेतील सत्ताधारी शिवसेना किती काळ आपली जबाबदारी झटकण्याचे काम करणार. मुळात शिवसेनेचा पालिका प्रशासनावर अंकुश नाही. प्रशासन सत्ताधाऱ्यांना जुमानत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या. पण कारवाई मात्र कुणावरच झालेली नाही. मुंबईतील प्रत्येक कामाची जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांवर निश्चित करण्याची गरज आहे. तरच नागरी कामांच्या दर्जात सुधारणा होईल आणि भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत. अन्यथा वारंवार दुर्घटना घडतील आणि त्यात नागरिकांचा बळी जातच राहील,’ अशी प्रतिक्रिया पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.‘नियोजन प्राधिकरण आणि आपत्कालीन व्यवस्थापन या दोन्हीची जबाबदारी मुंबई महापालिकेचीच आहे. मात्र याबद्दल पालिका एक शब्दही काढायला तयार नाही. पुलाची जबाबदारी रेल्वेचीच असल्याचे सांगून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हात झटकण्याचा प्रकार केला. महापौरांनी मन मोठे करून पुलाच्या देखभालीवर दुर्लक्ष झाल्याचे सांगितले असते तर बरे झाले असते’ अशी टीका समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली.

गोखले पुलाच्या दुरुस्तीसाठी २३ लाख

मुंबई : गेल्या चार वर्षांमध्ये पालिकेने रेल्वेच्या हद्दीमधून जाणाऱ्या पादचारी आणि उड्डाणपुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल १०३ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त गोखले उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २३ लाख रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा करण्यात आले होते. पालिकेच्या निधीतून दुरुस्त करण्यात आलेल्या पादचारी आणि उड्डाणपुलांचा संरचनात्मक अहवाल मागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र त्याच वेळी गोखले पूल दुर्घटनेला सर्वस्वी रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला.या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे रेल्वेची असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी पालिका मुख्यालयात मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गेल्या चार वर्षांमध्ये अन्य पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून मध्य रेल्वे प्रशासनाला ९२ कोटी रुपये, तर पश्चिम रेल्वे प्रशासनाला ११ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे विजय सिंघल यांनी सांगितले.