तीव्र दुष्काळामुळे संपूर्णपणे कर्जमाफी केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी गुरुवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, भाई जगताप यांच्यासह सर्वच विरोधक या आंदोलनात सहभागी झाले. सरकारच्या धोरणांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर ‘हेच का अच्छे दिन’ असे फलकही दाखविण्यात आले. विधानसभेमध्ये गुरुवारी दुपारी या विषयावर चर्चा होणार आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण सरकारला त्याबद्दल चिंता नाही. सरकारने केलेली दुष्काळी मदत तकलादू आणि फुटकळ आहे. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालता येणार नाही. दुष्काळी शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भावनाच नाही, असे यावेळी विरोधकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. राज्यपालांचे अभिभाषणानंतर गुरुवारपासून दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात होते आहे.