मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ पेक्षा अधिक करण्याच्या पालिकेच्या निर्णयाला मुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला आहे. या निर्णयाविरोधात येत्या २७ जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच निवृत्ती वय वाढविण्याची प्राध्यापकांची मागणी मान्य करू नये, असे पत्रही संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
वरिष्ठ प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ वर्षे असून, प्राध्यापकांची रिक्त पदे आणि अनुभवी डॉक्टरांची कमतरता असल्याचे कारण देत पालिकेने यांना तात्पुरती एका वर्षाची वाढ दिली आहे. एकीकडे पालिकेच्या आयुक्तांनीच ५८ वर्षांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामावर येऊ नये, असे आदेश दिले होते आणि दुसरीकडे करोनाच्या नावाखाली त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचे पालिकेचे दुटप्पी धोरण आहे. नुकत्याच झालेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तपासणीत वरिष्ठ प्राध्यपकांची पदे रिक्त नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यांचे निवृत्ती वय ६२ हून अधिक करण्याची आवश्यकता नसून हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
वरिष्ठ प्राध्यापकांचे निवृत्ती वय २००९ मध्ये ५८ वरून ६२ वर्षे केले त्या वेळीच पालिकेने पुन्हा यात वाढ केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची अन्य जिल्ह्यांमध्ये बदली केली जात नाही. तसेच त्यांना खासगी सेवा देण्याचीही अनुमती असल्याने वरिष्ठ प्राध्यापक त्यांची पदे सोडण्यास तयार नाहीत. परिणामी कनिष्ठ गटातील प्राध्यापकांची पदोन्नती अनेक वर्षे रखडली असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
केवळ रुग्णसेवा देण्यासाठी वरिष्ठ प्राध्यापकांनी विभागप्रमुख, अधिष्ठाता इत्यादी प्रशासकीय पदे सोडून उपनगरीय रुग्णालयांमध्ये कंत्राटी स्वरूपात सेवा बजावावी, हा पर्याय पालिकेने पुढे करावा, असे संघटनेने सूचित केले आहे. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाविरोधात संघटनेने २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 1:39 am